काडीमोडानंतरची जवळीक

सोनम परब 
बॉलीवूडच नव्हे तर आज सबंध देशभरात वाढत्या घटस्फोटांमुळे विवाहसंस्थेपुढे आव्हान उभं केलं आहे. मात्र बॉलीवूडमधील ब्रेकअप्सची, घटस्फोटांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. अलीकडील काळात या चंदेरी दुनियेतील जोडप्यांना विभक्‍ततेचे ग्रहण लागले आहे. ऋतिक रोशन आणि सुजान खान यांच्या घटस्फोटाची मध्यंतरी भरपूर चर्चा झाली. पण आता हे दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मुलांचा विचार करून “असा’ निर्णय ते घेऊ शकतात अशी चर्चा आहे. मागील काळात अन्नू कपूर, एलिझाबेथ टेलर, पामेल अँडरसन यांनी विभक्‍त होऊन नंतर त्याच जोडीदाराशी जवळीक साधत नव्याने संसार थाटला आहे.
ऋतिक आणि सुजान हे पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्थात, अशा प्रकारची कृती करणारी ही जगातील पहिली जोडी नव्हे. जगभरात अशाही काही सेलिब्रिटी आहेत की त्यांनी एकापेक्षा अधिक विवाह करून पुन्हा जुन्या जीवनसाथीबरोबर सूत जुळवून घेताना दिसतात. जेव्हा प्रेम करणारे युवक-युवती विवाह करतात तेव्हा सर्वच जण आनंदी होतात. मग आपले नातेवाईक असोत किंवा सेलिब्रिटी असो. मात्र कालांतराने ही मंडळी जेव्हा वेगळे राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना, चाहत्यांना दु:ख झाल्याशिवाय राहात नाही. ऋतिक रोशन आणि सुजान खान यांच्याबाबतही असेच घडले. बॉलीवूडमधील एक सुंदर जोडपे म्हणून त्यांची ओळख होती. मात्र मध्यंतरी या जोडगोळीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अर्थातच यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आता ते पुन्हा एकत्र येण्यासाठी धडपड करत असल्याचे ऐकिवात आहे.
अर्थात, ऋतिक आणि सुजानने घटनस्फोटानंतरही आपल्या संबंधात फारशी तेढ येऊ दिली नाही. हे दोघे आपल्या मुलांबरोबर एकत्रितपणे सुटी व्यतित करताना दिसताहेत तर कधी चित्रपट पाहण्यासाठी तर कधी डिनरला देखील एकत्र आले आहेत. अलीकडेच कामाच्या व्यग्रतेतून ऋतिकने वेळ काढून स्वित्झर्लंड आणि इटलीचे पर्यटन केले. तेथे आपल्या दोन्ही मुलांसमवेत सुटीचा आनंद घेताना तो दिसून आला. ऋतिक रोशन हा नेहमीच वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत राहिला आहे.
सुजान खानशी काडीमोड असो किंवा कंगना राणावतबरोबरचा सुरू असलेला वाद. परंतु सध्याचे वातावरण पाहता त्याची पत्नी ऋतिक आणि सुजान पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यता बळावली आहे. ही त्याच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ते लवकरच विवाह करू शकतात, असे म्हटले जात आहे. मोडकळीस आलेल्या संसाराला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचा प्रयत्न ऋतिक रोशन करत आहे. हा निर्णय ते आपल्या मुलांमुळे घेत असल्याचे सांगितले जात आहे. दोघांची मने भंगलेली असली तर त्याचा परिणाम मुलांवर होऊ नये यासाठी ऋतिक नव्याने संसार थाटण्याबाबत गंभीर झाला आहे.
ऋतिक आणि सुजानचा विवाह 2000 मध्ये झाला होता. तब्बल 14 वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पण या घटस्फोटामागचे नेमके कारण काय, हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. ऋतिकचे दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर गुफ्तगू सुरू असल्याने संसार मोडला किंवा अर्जुन रामपालसाठी सुजानने लग्न मोडले अशीही चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली. काही महिन्यांपूर्वी अर्जुन रामपालही तब्बल 20 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर मेहर जेसियापासून विभक्त झाला. त्यानंतर सुजान आणि रामपाल विवाहबद्ध होणार असल्याचा वावड्या उठल्या होत्या. मात्र ही अफवाच राहिली. आता तर सुजान ऋतिकसोबत आनंदाने वावरताना दिसत आहे.
ऋतिकच्या निकटवर्तीयांच्या मते, ऋतिक आणि सुजान यांना एकमेकांच्या उणिवा आणि बलस्थानं चांगली माहित आहेत. ते एक-मेकासमवेत वेळ घालवतात. त्यांच्यातील प्रेम अजूनही जिवंत आहे. वेगळे राहून आपण आयुष्य जगू असे त्यांना वाटत नाही. मात्र याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता, ही बातमी खोटी असल्याचे सांगतात. 44 व्या वाढदिवसानिमित्त सुजानने ऋतिकला बर्थ डे विश केले तेव्हा सर्वांनाच काहीतरी गुडन्यूज मिळेल, असे वाटले होते. एवढेच नाही तर सुजानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले होते, की तू माझ्या आयुष्याचा नेहमीच दीपस्तंभ बनून राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमी हसत राहा आणि आपले कर्तृत्व अधिकाधिक देदीप्य- मान होवो. यातून बरेच काही स्पष्ट होते.
ऋतिक आणि सुजान यांचे जीवन मैत्री, प्रेम, विवाह आणि काडीमोड अशा अनेक चढउतारांनी व्यापलेले असून आगामी काळात या दोघांवर आधारित पुस्तकही प्रसिद्ध होणार आहे. या पुस्तकात त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक सुजान खानचे वडील प्रसिद्ध अभिनेते संजय खान लिहिणार आहेत. कारण ऋतिक आणि सुजान हे 17 वर्षांनंतर वेगळे झाले. ही घटना दोन्ही कुटुंबांसाठी खूपच मानसिक त्रास देणारी ठरली. या पुस्तकातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
मध्यंतरी कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यात बराच काळ वाद रंगला होता. त्यावेळी ऋतिकच्या बचावासाठी सुजान समोर आली होती. ऋतिकने कंगनाला एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत “सिली एक्‍स’ असे म्हटले आणि तेथेच वादाची ठिणगी पडली. ऋतिकपासून विभक्‍त झालेल्या सुजानने मात्र त्याच्या समर्थनार्थ ट्विट करत कंगनाचे आरोप खोडून काढले होते. याचाच अर्थ घटस्फोटानंतरही सुजानच्या मनात ऋतिकविषयी नाराजी नाही. कारण त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यांच्या विवाहात अनेक समस्या निर्माण झाल्या असतीलही; पण तशा समस्या अनेकांच्या आयुष्यात होतात. ज्या पद्धतीने दोघे घटस्फोटानंतर एकमेकांशी संबध राखून आहेत, ती बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.
भलेही ते चांगले पती-पत्नी म्हणून ओळखले जात नसतील मात्र आता ते चांगले आई-वडील होऊ इच्छित आहेत. ऋदान आणि रेहान या दोन मुलांची काळजी या दोघांना सतत असते. पालक म्हणून सर्वकाही ते देऊ इच्छित आहेत. मुलांचे प्रेम आणि त्यांच्यातील मैत्री ही पुन्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी पूरक ठरत आहेत.
घटस्फोटानंतर पुन्हा जोडीदारासोबत विवाह करणे हे शहाणपणाचे ठरते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बॉलिवूडचा अभिनेता अन्नू कपूरचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. अन्नू कपूरने 1992 मध्ये अनुपमासमवेत विवाह केला होता. मात्र त्यांच्यात बिनसल्याने घटस्फोट झाला. त्यानंतर अन्नू कपूरने वेगळा संसार मांडला. त्याचवेळी अनुपमाने देखील नवा पार्टनर शोधला. मात्र त्या दोघांचेही विवाह टिकले नाहीत. शेवटी 2008 मध्ये अन्नू आणि अनुपमा यांनी पुन्हा विवाह केला.
ब्रिटिश-अमेरिकी अभिनेत्री एलिझाबेथ टेलरने आपल्या काळात मोठे नाव कमावले होते. तिने आपल्या आयुष्यात 8 विवाह केले.
कॅनेडियन अमेरिकी अभिनेत्री पामेला अँडरसन ही बेवॉचमुळे प्रसिद्ध झाली. पामेलाने तीन विवाह केले. 2007 मध्ये तिने रिक सलमॉनशी विवाह केला. हे नाते वर्षभर देखील टिकले नाही. मात्र त्यांचे सूर पुन्हा जुळले. 2014 मध्ये तिने त्याच्याशी विवाह करून संसार थाटला.
मार्शल आर्ट चित्रपटाने प्रसिद्ध झालेला बेल्जियमचा अभिनेता जीन क्‍लॉड वॅन डॅमने पाच विवाह केले. मात्र बॉडी बिल्डर ग्लॅडिजशी दोनदा विवाह केला. 1987 मध्ये विवाह केला होता. मात्र 1992 मध्ये घटस्फोट झाला. कालांतराने सात वर्षांनंतर 1999 मध्ये पुन्हा दोघांचा विवाह झाला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)