शिवतारे अजित पवारांना काय उत्तर देणार?

राजगुरुनगर – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यातील रणकंदनाचा दुसरा भाग आता शिरुर आणि मावळात रंगणार आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत विजय शिवतारे पुढच्यावेळी कसा आमदार होतो, तेच बघतो अशी थेट धमकी अजित पवारांनी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री शिवतारे अजित पवारांना काय उत्तर देणार? याची उत्कंठा पणाला लागली आहे. काळूस (ता. खेड) येथे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री विजय शिवतारे यांची जाहीर सभा होणार आहे. अजित पवारांना या सभेत शिवतारे प्रत्युत्तर देतील असे समजते.

बारामतीत भाजपच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेना-भाजपा आणि महायुतीच्या इतर नेत्यांनी पवारांच्या तोंडाला फेस आणला आहे. कधीकाळी बारामतीत केवळ एक सभा घेणारे शरद पवार आता कोपरा सभा सुद्धा घेऊ लागले आहेत. पवारांच्या पाडापाडीच्या राजकारणाचा संदर्भ देत विजय शिवतारे यांनी इंदापूर, भोर आणि पुरंदरच्या मतदारांना खासकरून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना साद घातली होती.

बारामतीची निवडणूक शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी गाजली. अजित पवारांनी तर बारामतीत प्रचाराला आलेल्या आमदार योगेश टिळेकर, विजय शिवतारे, राहुल कुल, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ यांच्याकडे बघून घेतो अशी थेट गर्जनाच बारामती येथे केली. दि. 23 तारखेला बारामतीचे मतदान संपल्यानंतर शिवतारे आपला मोर्चा शिरुर आणि मावळमध्ये वळवणार आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे हे पवारांचे कडवे विरोधक मानले जातात. त्यामुळे विजय शिवतारे विरुध्द अजित पवार हा पुढच्या टप्प्यातील सामना आता शिरुर आणि मावळच्या मतदारांना पाहायला मिळेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)