भारतीय बाजारात 90 टक्‍के चिनी माल-त्यावर बहिष्कार कसा टाकणार? व्यापारी

नवी दिल्ली – बाजारात सध्या 90 टक्‍के चिनी माल भरलेला आहे. त्यावर बहिष्कार कसा टाकणार? असा प्रश्‍न स्थानिक व्यापारांनी उपस्थित केला आहे. सीएआयटी (कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आणि मंगळवारी चिनी वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मंगळवारी देशभरातील सुमारे 1500 ठिकाणी चिनी वस्तूंची जोरदार होळी करण्यात आली. मात्र असे असूनही स्थानिक व्यापारी आणि फेरीवाले यांनी चिनी वस्तूंची विक्री चालूच ठेवली आहे. इतर वस्तूंबरोबरच सध्या होळी असल्याने रंगाच्या चिनी पिचकाऱ्यांची आणि पंपांची विक्री जोरात चालू आहे.

आम्ही चिनी वस्तूंचा साठा अगोदरच करून ठेवला असल्याने आम्हाला त्यांची विक्री करणे भाग आहे. लोकांकडून जोरदार मागणी असल्याने त्याची विक्री आम्ही करतच राहू, असे व्यापारी आणि फेरीवाले यांनी म्हटले आहे. सध्या बाजारात 90 टक्के माल चिनी बनावटीचा भरलेला असल्याने त्यावर बहिष्कार घालणे कसे शक्‍य आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. विशेषत: सणावाराच्या दिवसांत तर बाजार चिनी वस्तूंनी भरभरून जातो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जर चिनी मालावर खरोखर बहिष्कार टाकायचाच असेल, तर केंद्र सरकारने चिनी मालाची आयातच बंद केली पाहिजे असे त्यांचे रास्त म्हणणे आहे. किंवा मग चिनी मालावर 300 ते 500 टक्के अबकारी कर लागू केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक बंदरावर येणाऱ्या चिनी मालाची कडक तपासणी केली पाहिजे. कारण कर चुकवण्यासाठी चीनहून येणाऱ्या मालाची किंमत अतिशय कमी दाखवण्यात येत असते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)