‘सायटिका’ घातक आजारावर मात

डॉ. दीप्ती पोतदार

पाठीची आणि कंबरेची दुखणी ही वाढत्या वयात फार त्रासदायक ठरतात. लंबर स्पॉंडिलायडीस आणि सायाटिका यांचे अतिशय जवळचे नाते आहे. सायटिका अर्थात कटीशूळ वेदना कमी करण्यासाठी अनेक उपाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या विषयी 

डाव्या पायात खुब्यापासून टाचेपर्यंत असह्य कळा येत आहेत, उभे राहणेही अवघड झाले आहे, अशा प्रकारची तक्रार घेऊन काही दिवसांपूर्वी एक मध्यमवर्गीय चाळिशीतील महिला माझ्याकडे होमिओपॅथिक उपचारासाठी आली होती. तिची प्राथमिक माहिती जाणून घेतल्यावर मी तिच्या दिनक्रमाविषयी चौकशी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतर महिलांप्रमाणे तिचा दिवससुद्धा सकाळी लवकर सुरू होणारा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून मुुुलांच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. सकाळची मुलांची शाळेची गडबड संपल्यावर स्वत:च्या ऑफिसची वेळ गाठायची म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच. दुचाकीने प्रवास झाल्यास येता जाता एखादे जास्तीचे कामदेखील निघतच असते. एखाद्या दिवशी दुचाकी नसल्यास बस किंवा रिक्षा करून कशीबशी वेळ गाठायची. प्रत्येक सेकंद लढवत ऑफिस गाठल्यावर दिवसभर एकाच जागी बसून काम करायचे. या शिवाय इतरही काही कामे असतात ती बऱ्याचवेळा उभ्यानेच होत असतात. परिणामी शरीराची वाकण्याची सवयच मोडलेली. दिवसभराच्या या प्रवासात शरीराला कुठे, कधी आणि कसे हादरे बसतात याकडे लक्ष देण्यासाठी वेळच शिल्लक नसतो. महागाईशी सामना करीत कुटुंबासाठी राबणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची ही दिनचर्या. तर या महिलेचा पंधरवड्यापूर्वी ऑफिसचे काम आटोपून घरी परतल्यावर घरकामाच्या गडबडीत एक दिवस तिचा पाय मुरगळला. पायामध्ये कळा जाणवू लागल्या. काही जुजबी घरगुती उपचार करून मुरगळलेला पाय बराही झाला. सारे काही सुरळीत चालू असतानाच नुकत्याच रस्त्यावर नव्याने घातलेला गतिरोधक लक्षातच आला नाही आणि कमरेला चांगलाच हादरा बसला. मात्र दिवसभराचे कामकाज थोडेच चुकणार होते? दिवस जसा जसा पुढे सरकत होता तसा कमरेपासून डावा पाय मागील बाजूने दुखायला सुरुवात झाली. घरी आल्यावर पुन्हा केलेल्या घरगुती उपायांमुळे वेदना थांबल्या खऱ्या, मात्र, कोणत्याही शारीरिक कष्टाच्या कामानंतर हे दुखणे वरचेवर डोके वर काढू लागले. शेवटी सगळ्या त्रासाला वैतागून वेळात वेळ काढून ती महिला माझ्याकडे आली होती. तिने सांगितलेले हे दुखणे सायटिकाच आहे हे ध्यानात यायला मला मुळीच वेळ लागला नाही. तिच्या व्याधीची तीव्रता जाणून घेतल्यावर मी तिला होमिओपॅथिक औषधे योग्य मात्रेमध्ये दिले. औषध घेण्याच्या वेळा चुकवू नका, असे कटाक्षाने सांगितले. या उपचारांमुळे तिच्या पायातील वेदनेची तीव्रता माझ्या अपेक्षेप्रमाणेच तीन ते चार दिवसांमध्येच कमी झाली होती.

सायटिका हा आजार केवळ चाळीशीतच होतो, असे नाही. कमी वयातसुद्धा या तक्रारी सुरू होऊ शकतात. त्याचप्रमाणे आयुष्यभर कामाचा व्याप सांभाळून उतार वयात लांबचा प्रवास करून आल्याचे निमित्तदेखील सायटिकासाठी पुरेसे होऊ शकते. आपल्या कमरेमधून पायाकडे जाणारी एक शिर असते. तिलाच “सायटिका’ असे संबोधतात. सायटिकाचा आजार या शिरेला झालेल्या दुखापतीमुळे होत असतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या पाठीमध्ये मणक्‍यांची एक माळ असते. यातील प्रत्येक दोन मणक्‍यांमध्ये कुर्चाचे मऊ हाड असते. हे हाड दोन मणक्‍यांमध्ये गादीप्रमाणे काम करते. मेंदूकडून मज्जारज्जू मणक्‍यामधून खाली येत असतात. या मज्जारज्जूपासून शरीराच्या प्रत्येक भागाला मेंदूकडून संवेदनांची देवाण-घेवाण सुरळीतपणे होत असते. मज्जारज्जूंपासून विभागलेल्या मज्जातंतूंमार्फत हे काम होत असते. हे मज्जातंतू दोन मणक्‍यांमध्ये असणाऱ्या पोकळीतून बाहेर पडून शरीराच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही भागाकडे जात असतात. एखादेवेळी कमरेला जोराचा हादरा बसला असता दोन मणक्‍यांमधील ही पोकळी कमी होते. त्याचाच परिणाम त्यामधून जाणाऱ्या शिरेवर म्हणजेच सायटिकावर होतो. ही शिर दाबली तरी जाते किंवा तिच्यावर भार तरी येतो. अर्थातच अशावेळी तिच्या कामांवर निश्‍चितच परिणाम होतो. कमरेचा पाचवा मणका आणि माकडहाडाचा पहिला मणका यांच्यामधून जाणारी ही सायटिका नावाची शिर जेव्हा दबली जाते, त्यावेळी कमरेपासून खाली पायापर्यंत वेदना होत राहतात. ही शिर किती प्रमाणात दबली गेलेली असते, त्यानुसार वेदनेच्या तीव्रतेमध्ये बदल घडत असतो. दुखापत उजव्या बाजूस झालेली असूनही दुखणे मात्र, विरुद्ध बाजूस म्हणजे डाव्या बाजूस असते, असेही बऱ्याचवेळा आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे दुखापतीमुळे मणक्‍याच्या मधल्या मऊ हाडावर उजव्या बाजूस दाब पडतो. परिणामी त्याच्या विरुद्ध बाजूवर म्हणजेच डाव्या बाजूवर ताण येतो आणि त्या बाजूस सायटिकाची लक्षणे दिसू लागतात.
सायटिकाच्या तक्रारींमध्ये बऱ्याचवेळा रूग्णाला पायाच्या कोणत्याही भागामध्ये आगआग, जळजळ होत असल्याचे दिसून येते. काही रूग्णांच्या मांडीच्या मागील भागात तर काहींच्या पोटरीमध्ये तर बहुतांशवेळा पायांच्या बोटांना मुंग्या येतात. तेवढाच ठराविक भाग प्रचंड बधिर झाल्यासारखा वाटतो. त्या भागामध्ये संवेदनांचा पुरवठा करणारी शिर दुखावली गेली असल्यास शरीराच्या अशा ठराविक भागात अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात. सायटिकाचा त्रास सुरू झाल्यानंतर पाय जड होणे तसेच पायातील शक्‍तीच नष्ट झाल्यासारखे वाटणे अशा प्रकारची लक्षणे सुरू झाली तर हे दुखणे बरेचसे वाढलेले असते असा याचा अर्थ आहे. काही व्यक्‍तींचा स्वभाव स्वत:च्या शारिरीक तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा असा असतो. स्त्रियांच्या बाबतीत सांगावयाचे झाले तर आपल्या कुटुंबासाठी राबणारी बहुतांशी प्रत्येक स्त्री तिच्या शारीरिक तक्रारी अंगावरच काढणे पसंत करते. तक्रारींचा प्रकार सामान्य असेल तर अशा प्रकारची हेळसांड समजून घेता येईल; मात्र, सायटिकाच्या बाबतीतील दुखणे अंगावर काढणे म्हणजे धोक्‍याची घंटा आहे. या आजाराची सुरुवात झाल्यावर लगेचच योग्य ते औषधोपचार केले गेले नाहीत तर पुढे दुखणे वाढत जाऊन पॅरॅलेसिस म्हणजे अर्धांगवायू अर्थात पक्षाघात होण्याचा दाट संभव असतो.

सायटिकाच्या दुखण्याचे प्रमाण जाणवू लागले म्हणजे प्रथम अजिबात घाबरून जाऊ नका. या आजारासाठी त्याच्या प्रत्येक अवस्थेवर होमिओपॅथीमध्ये निरनिराळी औषधे अचूक काम करतात. ज्या रुग्णांना बराचवेळ एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून उठल्यानंतर पाय दुखण्याचे प्रमाण जाणवते आणि या कारणामुळे चालतानासुद्धा त्या रुग्णांना त्रास होत राहतो, अशा तक्रारींमध्ये ऱ्हस टॉक्‍स हे औषध उपयुक्‍त ठरते. सायटिकाच्या काही रुग्णांमध्ये कमरेपासून सुरू होणारी कळ ही मांडीच्या मागच्या भागापुरतीच मर्यादित असते. अशावेळी रूटा नावाचे औषध उत्तम प्रकारे काम करते. अशा रुग्णांची कंबर बऱ्याचवेळा अखडलेली वाटते. तर आडवे पडल्यानंतर त्यांचा त्रास वाढलेला आढळतो. हायपरिकम हे औषध कमरेच्या मणक्‍यातील दोषावर रामबाण उपाय ठरते. त्याचप्रमाणे पायाच्या बोटांमध्ये मुंग्या येणे, पाय बधिर होणे यावर या औषधाचा चांगला परिणाम दिसून येतो. ग्नॅफॅलिअम, लॅथिरस ही औषधेदेखील पायाच्या पोटऱ्यांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे अशा तक्रारींवर उपयोगी ठरतात. रुग्णाच्या कोणत्या पायाच्या भागात त्रास होत आहे, तसेच दिवसभरातील कोणती कामे केल्यानंतर तक्रारी कमी-जास्त होतात, याचा योग्यरितीने अभ्यास करून होमिओपॅथीमधील अचूक औषध दिल्यास सायटिकाचा त्रास कायमचा बरा होण्यामध्ये मदत होते. होमिओपॅथीची औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच योग्य मात्रेमध्ये घ्यायला हवीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)