सातारा – लोकसभेच्या निकालासाठी आता केवळ पाच दिवस बाकी राहिले आहेत. अशावेळी जिल्ह्यातील जनतेच्या नजरा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत. दोन्ही मतदारसंघात यंदा दोन प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली आहे. परिणामी उर्वरित पराभूत उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली जाणार आहे. त्यामुळे किती उमेदवार आपले डिपॉझिट तथा अनामत रक्कम राखण्यात यशस्वी होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला पंचवीस हजार तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपये डिपॉझिट स्वरूपात भरणे बंधकारक होते. निवडणुकीत मतमोजणीमध्ये विजयी उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या मतांच्या तुलनेत पराभूत उमेदवाराला एक तृतीअंश मते प्राप्त झाली तर डिपॉझिट रक्कम परत मिळते. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघातील सन 2014 च्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सर्वच 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांनी 5 लाख 22 हजार 531 मते घेत विजयी झाले होते. उर्वरित एकाही प्रतिस्पर्धी उमेदवाराला एक तृतीयांश मते प्राप्त करता आली नाहीत.
यंदाच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी खा. उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीने लढत होणार आहे. साताऱ्यात सात तर माढ्यात 31 उमेदवार असल्यामुळे डिपॉझिट जप्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. साताऱ्यात कोण किती डिपॉझिट वाचवणार हा मतदारसंघातील खऱ्या अर्थाने उत्सुकतेचा विषय आहे.