पक्षाकडून उमेदवार कसा निवडला जातो ?

पडद्यामागे 

लोकसभा निवडणुकांसाठी अद्यापही राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होतच आहेत. अर्थातच केवळ इलेक्‍टिव मेरीट पाहूनच आम्ही उमेदवारी देतो असे पक्षांकडून कितीही सांगण्यात येत असले तरी त्याला अन्यही अनेक पदर असतात. यामध्ये नव्या-जुन्या इच्छुकांची भाऊगर्दी हा मुख्य अडथळा असतो. एकाला उमेदवारी देताना अन्य नाराज होणार नाहीत, बंडाचे हत्यार उपसणार नाहीत, दगाफटका करणार नाहीत याची काळजी पक्षनेतृत्वाला आणि ज्येष्ठांना घ्यावी लागते. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची ही उमेदवार निवडीची प्रक्रिया ही वेगळी असते.

भारतीय जनता पक्ष ः
निवडणुकीच्या रणभूमीवर आपला उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय भारतीय जनता पक्षात केंद्रीय निवड समितीकडून घेतला जातो. तथापि, उमेदवार निवडीची प्रक्रिया तालुका आणि जिल्हा स्तरावरून सुरू होते. राज्याचे प्रभारी सर्वप्रथम प्रत्येक राज्यातील जिल्हास्तरीय युनिटकडून त्यांचे मत जाणून घेतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कोणाला उमेदवारी द्यायची आहे आणि का हे यातील महत्त्वाचे प्रश्‍न असतात. त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडूनही त्यांची मते जाणून घेतली जातात. ही सर्व प्रक्रिया अनौपचारिक पद्धतीने पार पडत असते.

यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महामंत्री, संघटना मंत्री आणि पक्षाचे प्रभारी त्या राज्यातील वरिष्ठ-ज्येष्ठ नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा करून, विचारविनिमय करून प्रत्येक मतदारसंघासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्‍कामोर्तब करते. अर्थात यावर सहमती मिळवण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे मानदंड दिले जातात. काही वेळा नेत्यांची आपली आवड-नावड यामध्ये महत्त्वाची ठरते. काही वेळा सोशल मीडियावर त्या उमेदवाराची किती लोकप्रियता आहे हेही पाहिले जाते. काही राज्यातील प्रभारी तर आपल्या अखत्यारित एखादे सर्वेक्षणही करून त्या उमेदवाराची लोकप्रियता जाणून घेतात.

उमेदवाराविषयी वेगवेगळी मते असली तरी त्यातून सहमती तयार करून एक यादी तयार केली जाते आणि ती राज्यांकडून केंद्रीय निवड समितीला पाठवली जाते. जेव्हा उमेदवाराची अंतिम निवड करण्यासंबंधीची बैठक असते तेव्हा केंद्रीय निवड समितीतील सदस्यांसोबत त्या-त्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, महामंत्री, संघटना मंत्री आणि प्रभारीही उपस्थित असतात. ही बैठक सुरू झाल्यानंतर सर्व सदस्यांना कळवण्यात येते आणि त्यानंतर कोणता उमेदवार निवडला गेला आहे त्याची अंतर्गत पातळीवर घोषणा केली जाते. त्या नावावर कोणत्याही सदस्याला आक्षेप असेल तर तो आपली भूूमिका मांडतो. त्यानंतर पुन्हा चर्चा होते.

काहीवेळा राज्यांकडून ठरवण्यात आलेला उमेदवार नाकारून निवड समिती दुसरा उमेदवार ठरवते. कारण अंतिम निवड ही केंद्रीय समितीचीच असते. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, जर कोणालाही उमेदवारीचे तिकीट हवे असेल किंवा पार्टीच्या केडरमध्ये प्रमोशन हवे असेल तर त्याच्या फेसबुक अथवा ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या किमान 3 लाख असली पाहिजे. खासदारपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मर्यादा 5 लाख ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)