पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे संतनगर, मोशी, सेक्टर क्रमांक 6 येथील ‘एलआयजी’ व ईडब्लूएस’ योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. तेथे सहा हजार घरे बांधण्याचे नियोजन असून त्यांची निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे हे काम खोळंबले असून या प्रकल्पाच्या कामाबाबत तोडगा निघालेला नाही. तसेच पालिकेच्याही आवास प्रकल्पांना विरोध सुरु झाला आहे. हा विरोध मोडून काढावा, अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.
त्यांनी पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदन नमूद केले आहे की, पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी आरक्षित जागेवर गरिबांना घरे उपलब्ध होणार आहेत. एका जागेत 700 घरे पंतप्रधान आवास योजनेमधून होत आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी यशवंतनगर झोपडपट्टीचे पुनवर्सन झोपडपट्टी पुवर्सन प्राधिकरणाकडून (एसआरए) होत आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिकांनी विरोध केला आहे. विरोधाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींमध्ये भाजप आमदार व भाजपाचे पदाधिकारीच आघाडीवर आहेत.