‘हॉरर’ नायिका

‘अमावस’
बॉलीवूडमध्ये आजतागायत अनेक भयपट येऊन गेले की त्यात अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला. रणबीर कपूरसमवेत रॉकस्टार करणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाकरीचा “अमावस’ चित्रपट गेल्या महिन्यात झळकला. या चित्रपटात तिने नाईलाजाने काम केल्याचे सांगितले जात आहे. पण बरेचदा अशा चित्रपटातून केला जाणारा अभिनय हाही कौतुकास पात्र ठरतो. मधुबालापासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक नायिकांनी भयपटात काम केले आहे. अर्थात नर्गिस फाकरीप्रमाणे त्यांचा बॅडपॅच नव्हता.

“बीस साल बाद’ आणि कोहरा
1960 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, नायक, नायिका आणि संगीतकार एकच होते. बीस साल बाद आणि कोहराचे निर्माते हेमंतकुमार होते. दिग्दर्शक बिरेन नाग आणि लेखक ध्रुव चॅटर्जी होते. नायक विश्‍वजित आणि नायिका वहिदा रेहमान होत्या. दोन्ही चित्रपटात सहनायकाची भूमिका मनमोहन कृष्ण, मदनपूरी आणि असित सेन यांनी बजावली होती. चित्रपटाच्या यशात संगीताचा वाटा मोठा होता. हेमंतकुमार यांनी संगीत दिले होते. चित्रपटात हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांचे सोलो गीत होते.

नंदा यांचा गुमनाम
राजा नवाथे यांचा 1965 मधील हॉरर चित्रपट गुमनाम कमालीचा गाजला. सात जणांना विमानातून एका निर्जन बेटावर उतरवले जाते. तेथे एकेकाची हत्या होते. यामागे कोण आहे, यात दर्शक अडकून पडतात. चित्रपटात नंदाची भूमिका प्रमुख होती. मनोज कुमार, प्राण, हेलन, मेहमूद, मदनपुरी आदी मातब्बर मंडळी होती. शंकर जयकिशनच्या मधुर संगीताने वेड लावले होते.

नागीन आणि जानी दुश्‍मन
राजकुमार कोहलीच्या 1970 च्या दशकात आलेल्या दोन भीतीदायक चित्रपटानी बॉलीवूड मध्ये रहस्यपटाचे युग आणले होते. या चित्रपटात रीना रॉय आणि रेखा व्यतिरिक्त योगिता बाली, मुमताज, नीतू सिंग, बिंदीया गोस्वामी या नायिका होत्या. तसेच तत्कालीन काळातील बडे स्टार यात होते. दोन्हीही चित्रपटांना लक्ष्मीकांत प्यारेलालचे संगीत होते आणि ते हिट ठरले.

उर्मिलाचे भूत
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी 2003 मध्ये भूत हा अजय देवगण, उर्मिला मातोडकर तसेच रेखा, नाना पाटेकर, सीमा विश्‍वास आणि व्हिक्‍टर बॅनर्जीसारख्या कलाकारांना घेऊन बनवला होता. या चित्रपटातील साऊंड ट्रॅकने श्रोत्यांना हादरविले होते. साऊंड इफेक्‍टमुळे हा चित्रपट भयपट ठरला.

विद्याचा भूलभुलैय्या
प्रियदर्शनने 2007 रोजी भूलभुलैय्याची निर्मिती केली. सायकॉलॉजिकल थ्रिलर विषय हाताळत त्याने चाहत्यांवर यशाचे गारुड घातले होते. अक्षयकुमार, विद्या बालन, अमिषा पटेल, शायनी आहुजा,परेश रावल आदी कलाकारांनी चित्रपट रंगतदार बनवला होता.

अनुष्का शर्माचा परी
प्रोसित रॉय दिग्दर्शित परी चित्रपट गेल्यावर्षी झळकला होता. यात अनुष्का शर्मा होती. या चित्रपटात अनुष्का शर्माने स्वत:वर केलेले प्रयोग आणि भीतिदायक दृश्‍य यामुळे हा चित्रपट श्रोत्यांच्या लक्षात राहिला.

मधुबालाचा महल
1949 मध्ये दिर्ग्दशक कमाल अमरोही यांनी महल हा भारतातील पहिला भयपट केला. या चित्रपटात श्रोत्यांना भीती घालण्याचा अजिबात प्रयत्न केला गेला नाही. या चित्रपटाची नायिका मधुबाला होती. खेमचंद प्रकाश यांनी संगीत दिले होते. चित्रपटाला संपादन करण्याची भूमिका विमल रॉय यांनी बजावली होती. आयेगा आयेगा, आनेवाला या गाण्याने लता मंगेशकर यांची ओळख प्रस्थापित झाली ती आजतागायत कायम आहे. विशेष म्हणजे अमेरिकी चित्रपट द इन्कॉर्नेशन ऑफ पीटर प्राऊड (1975) चे कथानक महल चित्रपटावर बेतलेले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)