हद्दीच्या वादाचे दुर्घटनेत रुपांतर

पुणे – होर्डिंग ही प्रशासकीय दुर्घटना वर्चस्व आणि हद्दीच्या वादाची दुर्देवी बाब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहिर अमर शेख चौकात होर्डिंग पडून झालेली दुर्घटना ही प्रशासकीय वर्चस्वाची आणि हद्दीच्या वादाची दुर्देवी बाब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या होर्डिंगला महापालिकेने दिलेली परवानगी नोव्हेंबर-2017 मध्येच संपली होती. त्यामुळे होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीने डिसेंबर-2017 मध्ये, तर महापालिकेने जानेवारी-2018 मध्ये रेल्वे प्रशासनास पत्र पाठवून या होर्डिंगवर कारवाईची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, “हे होर्डिंग आमच्या हद्दीत असल्याने आम्ही काय ते करू’ असे सांगत रेल्वे प्रशासनाने त्यावर कारवाई करणे टाळले आणि त्यामुळेच आठ महिन्यांनी ही घटना घडली आहे.

या ठिकाणी पालिकेने आकाशचिन्ह आणि परवाना नियमावलीनुसार, 10 बाय 20 फूट उंचीचा जाहिरात परवाना फलक लावण्याची परवानगी दिली होती. ज्या “कॅप्शन’ कंपनीला परवानगी होती, त्यांनी मुदत संपल्यानंतर पालिकेला पत्र पाठविले. तर, प्रत्यक्षात रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीनी हे होर्डिंग 40 फुटांपर्यंत वाढविण्यात आले. त्यामुळे जाहिरात कंपनीने डिसेंबर-2017 मध्ये रेल्वे प्रशासनास पत्र पाठवून येथील होर्डिंगचे चारही स्ट्रक्‍चर काढण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

मात्र, रेल्वेने त्यांना प्रत्युत्तर देत, “तुमचा करार संपला आहे. हे होर्डिंग रेल्वेच्या मालकीची आहेत,’ असे कळविले होते. तसेच त्यावर काही मोबाइल कंपन्यांना जाहीरात करण्यास मुभा दिला. त्यामुळे आकाशचिन्ह विभागाने याची गंभीर दखल घेत तत्कालिन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या स्वाक्षरीने 4 जानेवारी 2018 ला रेल्वेचे पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांना पत्र पाठवून हे अनधिकृत होर्डिंग काढण्याची सूचना केली होती. मात्र, त्यावेळी रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष करत पालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यानंतर महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची फेब्रुवारी-2018 मध्ये बैठक झाली. त्यात त्यांनी या होर्डिंगची परवानगी घेऊन पैसे भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे गेल्या सहा-आठ महिन्यांत होर्डिंग उभारणारी कंपनी आणि महापालिकेच्या पत्राची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती, तर ही वेळच आली नसती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)