राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कार आणि सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आज झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी सैन्य दलातील दोन किर्ती चक्र आणि 15 शौर्य चक्र प्रदान केली. जम्मू काश्‍मीर आणि ईशान्य भारतात लष्करी कारवाई करताना हौतात्म्य आलेल्या जवनांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपतींनी 16 वर्षीय इरफान रमझान शेख या जम्मू काश्‍मीरमधील युवकालाही शौर्य चक्र पुरस्काराने गौरवले. 2017 मध्ये इरफानने त्याच्या घरावर झालेला दहशतवाद्यांच्या हल्ल्याला धैर्याने तोंड दिले होते आणि हा हल्ला परतवून लावला होता.

केंद्रीय राखीव पोलिस दलातील सशस्त्र जवान सोवर विजय कुमार आणि हवालदार प्रदीप कुमार पांडा यांनाही किर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकनिष्ठपणे कर्तव्य बजावताना या दोघांनाही जम्मू काश्‍मीरमध्ये वेगवेगळ्या कारवाईदरम्यान हौतात्म्य आले होते. रायफल मॅन जयप्रकाश ओराओन आणि शिपाई अजय कुमार या दोघांना मणिपूर आणि जम्मू काश्‍मीरमधील दहशतवाद विरोधी कारवाईमधील योगदानाबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 13 परम विशिष्ट सेवा पदक, दोन उत्तम युद्ध सेवा पदक आणि 26 अति विशिष्ट सेवा पदकंही प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)