होळीच्या गोवऱ्यांनी सावरला प्रपंच

संग्रहित छायाचित्र...

-आनंद भवारी

बोपखेल – भल्या पहाटे कंबरेला पदर खोवायचा आणि गोठ्यांमधून शेण जमवायचे…, घरातील कामे उरकून दिवस डोक्‍यावर आला की गोवऱ्या थापायच्या…, त्या वाळवायच्या आणि त्याची उतरंड रचून ठेवायची…, अवकाळी पाऊस इतर गोष्टींपासून त्यांना जीवापाड जपायचे आणि होळी आली की त्यांची विक्री करायची असा बोपखेल मधील महिलांना दिनक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. या गोवऱ्यांमुळे त्यांना रोजगाराचे साधन मिळाले असताना दुसरीकडे वाढत्या शहरीकरणामुळे होळीच्या सणाबरोबरच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्यांची गरजही पूर्ण होत आहे.

-Ads-

सर्व बाजुंनी लष्कर असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगाव म्हणजे एखाद्या बेटावरील वस्ती. दुध व्यवसाय हा येथील स्थानिकांच्या उत्पन्नाचे साधन. येथील अनेकजण खडकी ऍम्युनिशन फॅक्‍टरीमध्ये कामाला आहेत. मात्र, जोडधंदा म्हणूनही दुधाचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे याठिकाणी पशुधन टिकून आहे. येथील अनेक महिलांनी शेणाच्या गोवऱ्यांना आपल्या रोजगाराचे साधन बनविले आहे. सध्या होळी जवळ आल्यामुळे या भागातून शहरात मोठ्‌या प्रमाणावर गोवऱ्या विक्रीसाठी पाठविल्या जात आहेत.

होळी पेटविताना गोवऱ्यांचा मोठ्‌या प्रमाणावर वापर होतो. होळीसाठी झाडांवर कुऱ्हाड चालविण्याऐवजी गोवऱ्यांचा वापर करुन होळी साजरी करण्याकडे शहरवासियांबरोबरच लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांचा वाढता कल आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून गोवऱ्यांना मागणी वाढली आहे. सहा महिन्यांपासून गोवऱ्या थापायला सुरुवात करावी लागते. दिवाळीचा सण झाल्यापासून गायी, म्हशींच्या शेणापासून व त्यात गवत टाकून गोवऱ्या थापतात. एक एक गोवरी वाळवून त्याचा साठा करून ठेवला जातो. गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणाऱ्या गोवरीला होळीसाठी जास्त मागणी असते, अशी माहिती नंदा घुले यांनी दिली.

दिवसाला पाचशे ते सातशे गोवऱ्या बनविल्या जातात. अनेक गोठ्यांमधून शेण आणले जाते. ज्या मालकाच्या गोठ्यातून शेण आणले जाते. त्याला तयार केलेल्या अर्ध्या गोवऱ्यांचा मोबदला दिला जातो. माती चिकटून गोवरीची गुणवत्ता खराब होऊ नये यासाठी खडकावर, भिंतीवर गोवऱ्या थापल्या जातात. महिन्याला सरासरी वीस हजार गोवऱ्या तयार होतात. अंत्यविधीसाठीही येथून गोवऱ्या नेल्या जातात, अशी माहिती मंदा देवकर यांनी दिली. इंधन दरवाढ त्यातच लाकूड उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक गरीब कुटुंब, पालावरील मंडळी जळणासाठी गोवऱ्या नेतात. यंदा सात रुपयाला एक गोवरी याप्रमाणे होळीसाठी गोवऱ्यांची विक्री होत असल्याची माहिती रंजना जपके यांनी दिली. काही विक्रेते आमच्याकडून शेकड्याने गोवऱ्या घेतात. त्यांना तीन ते चार रुपये एक गोवरी याप्रमाणे गोवऱ्यांची विक्री होते. होळीचा सण आमच्यासाठी “दिवाळी’ असते, असेही त्यांनी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)