एमआयडीसीतील पडून राहिलेल्या जागा ताब्यात घ्या

उदयनराजे भोसले, औद्योगिक विकासाबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती
सातारा – सातारा आणि नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुमारे 1974 च्या सुमारास सुरू झाल्या. नगर जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उद्योजकांना संरक्षण देण्याची हमी दिल्याने नगरच्या एमआयडीसीचा विकास झाला. परंतु, सातारच्या तत्कालिन लोकप्रतिनिधींची अनास्था आणि “नरो व कुंजरो वा’ अशी भूमिका यामुळे सातारच्या एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खापर मात्र तिसऱ्यावरच फोडले जाते. ज्या लोकांना औद्योगिक भूखंड दिले आहेत व जे भूखंड पडून आहेत, त्या जागा तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करा. इंडस्ट्री सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांना ती जागा द्या. आम्हाला रिझल्ट ओरिएन्टेड काम पाहिजे, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उदयनराजे भोसले यांनी आज सातारच्या एमआयडीसी कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी एमआयडीसी विकासाबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, उपअभियंता सुकुमार पोवार, क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, सहायक अभियंता विकास गायकवाड उपस्थित होते. “वेल स्टार्ट इज हाफ डन, म्हणतात त्याप्रमाणे येथील एमआयडीसीची सुरुवातच निरुत्साही लोकप्रतिनिधींमुळे चांगली झाली नाही. त्यामुळेच आजची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगून श्री. भोसले यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली.
सुरुवातीपासून सातारच्या जुनी आणि नवी एमआयडीसीकरीता जागा किती घेतली गेली.

ज्या जागा घेतल्या त्या मूळ मालकांना मोबदला मिळाला का, जागा किती व्यक्‍तींना रितसर प्रदान केली, कोणत्या कारणाकरीता दिली, आज त्या प्लॉटवर नेमका कोणता उद्योग सुरु आहे, त्यावेळच्या व नंतर सुधारित केलेल्या ले- आउटप्रमाणे रेसिडेन्सियल झोन, इंडस्ट्रियल झोन, रिफ्रेशमेंट झोन किती व कोणकोणते होते, याबाबतची माहिती तसेच इंडस्ट्रियल झोनकरीता सातारा जिल्ह्यात किती जागा आरक्षित करण्यात आली आहे याबाबतची माहिती दोन-तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी भोसले यांनी केल्या.

तसेच ज्यांनी इंडस्ट्रियल प्लॉट घेवून हौसिंग स्किमस्‌ राबवल्या जात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र स्कूटरची 60 एकर आणि शासकीय दूध डेअरीची सुमारे 40 एकर अशी मिळून 100 एकर जागा बिनवापराची आहे. त्याबाबत एमआयडीसी कार्यालयाने योग्य ती माहिती द्यावी. प्रादेशिक कार्यालयासह संबंधित प्लॉटधारकांची दि. 22 जून रोजी बैठक बोलावण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित टपरीचालक महिलांनी आमच्या टपऱ्या हलवल्या तर आम्ही जगायचं कसं, गेल्या आठ दिवसापासून आमची मुलं-बाळं उपाशी आहेत, आमच्यावर अन्याय करू नका, अशी विनंती केली. त्याचवेळी आम्ही कमर्शियल प्लॉट घेवून व्यवसाय करतो. आमच्या हॉटेलशेजारी दोन- दोन टपऱ्या टाकल्या आहेत, त्यामुळे सामान्य व्यक्‍ती हॉटेलऐवजी टपरीकडे जातात, आमच्या नोकरांचे पगारसुध्दा देता येत नाही, आम्ही जगायचं कसं, अशी विचारणा करुन टपऱ्या काढण्यात याव्यात, अशी मागणी हॉटेलचालकांनी केली

एमआयडीसीमधील प्लॉट वितरीत केले आहेत. तथापि ते प्लॉट बिनवापरात आहेत अशांची यादी करुन, जे प्लॉट पडून आहेत त्या जागा एमआयडीसीने ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करावी. एमआयडीसी एरियात छोटया टपऱ्या टाकून काही व्यक्‍ती आपला चरितार्थ चालवित आहेत, त्यांच्यावर तूर्त कारवाई करू नये. दि. 22 जूनच्या बैठकीनंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही खासदार भोसले यांनी यावेळी सूचित केले. प्रारंभी विक्रांत चव्हाण यांनी खासदार भोसले यांचे स्वागत केले. या वेळी माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संग्राम बर्गे, बाळासाहेब खरात, रॉबर्ट, शफी इनामदार, धनगरवाडीचे सरपंच तानाजी खरात, तसेच एमआयडीसी मधील टपरीधारक, हॉटेल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)