115 वी आगाखान हॉकी स्पर्धा : स्पार्टन पुणे संघाचा सलग दुसरा विजय

पुणे : महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने 115 व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात रत्नागिरी विरुद्ध जळगाव यांच्या सामन्यातील एक क्षण

पुणे – स्पार्टन इलेव्हन पुणे संघाने 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पिंपरी चिंचवड येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये सुरू आहे.

रविवारी झालेल्या पहिल्या लढतीत स्पार्टन पुणे संघाने भोपाळ अकॅडमी संघावर टायब्रेकमध्ये 6-5ने मात केली. ही लढत अखेरपर्यंत चुरशीची झाली. निर्धारित वेळेत लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. यात स्पार्टन पुणे संघाकडून अभिषेक स्वामी (25 मि.) आणि रवी सिंग (34 मि.) यांनी गोल केले.

या दोन्ही गोलसाठी प्रथमेशने सहाय्य केले. भोपाळकडून शुभम आव्हाडेने (47, 50 मि.) दोन्ही गोल केले. टायब्रेकमध्ये स्पार्टन पुणे संघाकडून भगवान पवार, रवींद्र सिंग, अजय एम., सुमित के. यांनी, तर भोपाळसंघाकडून महंमद अझीम, स्वप्नील आणि शुभम आव्हाडे यांनी गोल केले. दुसऱ्या लढतील नागपूर अकॅडमीने इराम क्‍लब नागपूरचा 1-0ने पराभव केला. नागपूर अकॅडमीकडून एकमेव गोल फरहान शेखने (30मि.) केला.

स्पर्धेतील शालेय गटात 14 वर्षांखालील मुलांमध्ये अर्जुन हरगुडेच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर नेताजी सुभाषचंद्र बोस स्कुलने ज्योती स्कुलवर 3-0ने मात केली. अर्जुनने 12व्या, 13व्या आणि 15व्या मिनिटाला गोल केले. स्पधेर्तील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात मॉडर्न पुणे संघाने नारायणगाव संघावर 2-0ने विजय मिळवला.

मॉडर्न संघाकडून रोशन (18) आणि अजयने (20) प्रत्येकी एक गोल केला. यानंतर पीसीएमसी संघाने जळगाव संघावर 6-0ने मात केली. यात नरेश वाल्मीकीने (5, 10, 11मि.) हॅट्ट्रिक केली. त्याला गणेश उकिरडे (4, 30 मि.) नीलेश एम. (3 मि.) यांनी चांगली साथ दिली. या गटातील तिसजया लढतीत भोपाळने सडनडेथमध्ये नागपूरवर 7-6ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली होती.

तर, स्पधेर्तील 14 वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरी संघाने जळगाव संघावर 1-0 ने मात केली. रत्नागिरी संघाकडून एकमेव गोल 6 व्या मिनिटाला अश्विनी राठोडने केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)