पुणे – सेंट ऍन्स प्रशाला संघाने हुसेन नबी चषक हॉकी स्पर्धेतील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी अँग्लो उर्दू प्रशाला संघाचा 3-1 असा पराभव केला. ही स्पर्धा नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती.
सामन्याच्या प्रारंभी अँग्लो उर्दू संघाने जोरदार चाली केल्या. सातव्याच मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत सानिया सय्यद हिने गोल करीत संघाला आघाडीवर नेले. मात्र, हे सातत्य त्यांना नंतर राखता आले नाही. सामन्याच्या दहाव्या मिनिटापासून सेंट ऍन्स संघाच्या आघाडी फळीला सूर सापडला. लगेचच त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रथमी शेट्टी हिने 11 व्या मिनिटाला गोल केला ब 1-1 अशी बरोबरी साधली.
हा गोल झाल्यानंतर सेंट ऍन्स संघाच्या आक्रमणास धार आली. सामन्याच्य 20व्या मिनिटाला जान्हवी परमार हिने कॉर्नर यशस्वी करत सेंट ऍन्स संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. पुढच्याच मिनिटाला तिया जॉर्ज हिने गोल करून संघाची बाजू 3-1 अशी बळकट केली. त्यानंतर त्यांच्या आक्रमक फळीतील खेळाडूंनी सातत्याने चाली करीत प्रतिस्पर्धी खेळाडूंवरूल दडपण वाढवले. अँग्लो उर्दू प्रशाला संघाच्या खेळाडूंना सेंट ऍन्सच्या भक्कम बचावापुढे आपला खेळ दाखवताच आला नाही.