एचआयव्ही बाधित मुलांचा नृत्यनाट्य कार्यक्रम

पुणे- एचआयव्ही बाधित मुलांबाबत समाजातील गैरसमजुती दूर करण्यासाठी झील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दि.15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील “सेवालय’ या एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील 40 एचआयव्ही बाधित मुले “हॅपी म्युझिक’ शो सादर करतील. हा कार्यक्रम एचआयव्ही आणि राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, देशभक्ती आणि लोककला याविषयी नृत्यनाट्यचा समावेश असेल.

झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांनी एचआयव्ही जनजागृतीबाबत तयार केलेल्या सेवालय एनजीओच्या वेबसाईटचे उद्‌घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र येथे दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होईल. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये एचआयव्हीग्रस्तांसाठी असलेल्या गैरसमजुती दूर करून त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. तसेच त्यांना मानसिक व आर्थिक मदत करणे हा आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन झील एज्युकेशन सोसायटीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)