नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात रा.स्व.संघाचा इतिहास 

नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकताच बीएचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये सामील करण्यात आलेला “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान’ हा विषय सध्या लक्षवेधी ठरतो आहे. हा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी अभ्यासक्रमात असलेले “नेचर ऑफ मोडरेट पॉलिटिक्‍स’ आणि “राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनलिजम’ हे दोन विषय या सत्रापासून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रनिर्माणातील योगदान याबद्दल माहिती नव्याने सामील करण्यात आली आहे. विद्यापीठात राजकीय पक्षांशी संलग्न संघटना कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठात संघ परिवारातील शिक्षण मंचाचे वर्चस्व बघता या बदलाला लगेच राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

दरम्यान, बीएच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती मिळणार असल्याचे समजताच अनेक ठिकाणाहून चर्चा, टीका सुरु झाली आहे. एकीकडे संघाची माहिती सामील केली आहे तर दुसरीकडे भारतीय कॉंग्रेसच्या सुरुवातीची माहितीही सामील करण्यात आली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात 2003 पासूनच संघाच्या इतिहासाबद्दल माहिती आहे. मात्र त्याचा मूळ भाग हा कुठेच अभ्यासक्रमात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.

हे या बदलांमागील एक महत्त्वाचे कारण असून त्याला राजकीय रंग नाही, असेही मत मांडण्यात आले आहे. भाजप सरकार आल्यापासून शिक्षणाच्या भगवीकरणाबद्दल आरोप होत आले आहेत. मात्र इतिहासाच्या कालखंडांकडे बघण्याचे अनेक दृष्टीकोन आहेत, जे वेगवेगळ्या वेळी अभ्यासक्रमात दिसले. त्यातील हा राष्ट्रवादाचा दृष्टीकोन सामील झाला तर त्यात काय चूक? असा उलट सवाल अभ्यास मंडळाचे सदस्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)