अबाऊट टर्न: ऐतिहासिक

हिमांशू

अखेर तो ऐतिहासिक क्षण आलाच. आम्ही काहीही केलं तरी ते ऐतिहासिकच असतं. आमचा नकारही ऐतिहासिक आणि होकारही ऐतिहासिक. नकारातला होकार आणि होकारातला नकारसुद्धा ऐतिहासिकच. मआता माघार नाही, हा वज्रनिर्धारही ऐतिहासिक आणि “झालं गेलं गंगेला मिळालं,’ हा सुज्ञपणाही ऐतिहासिकच. कर्ण्यावरून केलेली कर्णकर्कश भाषणंही ऐतिहासिक आणि दोस्तीसाठी दाखविलेला कर्णाचा उदारपणाही ऐतिहासिक. स्वबळ तर आहेच… अगदी ऐतिहासिक आहे. तरीही “जनतेच्या हितासाठी’ केलेला अपार त्यागही ऐतिहासिक.

वाघाचे दात मोजण्याची भाषाही ऐतिहासिक आणि दात मोजू पाहणाऱ्यांचे दात पाडण्याची भाषाही ऐतिहासिक. “राज्य कार्यकारिणीचा ठराव म्हणजे बेडकाचा डराव नसतो,’ ही डरकाळीही ऐतिहासिक आणि “माफिया राज खत्म करायचंय,’ ही भीष्मप्रतिज्ञाही ऐतिहासिक. शरयूपासून चंद्रभागेपर्यंत केलेली महाआरती ऐतिहासिक आणि शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी काढलेली शिवारफेरीही ऐतिहासिक. दिवसरात्र खिशात बाळगलेले ते राजीनामे ऐतिहासिक आणि स्वतंत्रपणे दिलेले वचननामेही ऐतिहासिक. केलेली कामंही ऐतिहासिक आणि अडवलेली कामंही ऐतिहासिक. कारण आम्ही माणसंच ऐतिहासिक. इतिहासापासून बोध घेऊन इतिहास घडवण्यासाठी अवतरलेली आम्ही माणसं. आम्हाला इतिहास कळतो आणि वळतोसुद्धा. म्हणूनच आम्हाला कळतं की, 2014 ची हवा ऐतिहासिक आणि 2019 ची हवाही ऐतिहासिक. एकूण काय, आम्ही करू ते सगळंच ऐतिहासिक.

गेली साडेचार वर्षे आम्ही एक ऐतिहासिक खेळ खेळत होतो. घटकाभर असं समजा की, आम्ही पबजी गेम खेळत होतो… ऑनलाइन आणि ऑफलाइनसुद्धा! ऑफलाइन प्रकारात सभा, संमेलनं, मेळावे, महामेळावे, वृत्तपत्रं, मुखपत्रं वगैरेंचा समावेश होता आणि ऑनलाइनमध्ये ट्विटर आदी माध्यमं होती. ऑफलाइन गेममध्ये आमची पहिली फळी कार्यरत होती, तर ऑनलाइनमध्ये दोन्हीकडच्या कुणालाही खेळायची परवानगी होती… अगदी पबजी गेमप्रमाणंच. यातून जे निर्माण झालं, त्याला कटुता म्हणणं कदापि योग्य ठरणार नाही. किंबहुना ते मूर्खपणाचं ठरेल. एकमेकांची उणीधुणी काढणं घरातल्या घरातसुद्धा चालू असतं. हा तर बोलून-चालून एक गेम. पबजीमुळं माणसं वेडी होतात म्हणून त्यावर बंदी घालावी, ही मागणी जितकी खुळचटपणाची, तितकंच आमची शाब्दिक हिंसा सीरियसली घेणंही भोळसटपणाचं.

गेममध्ये शत्रुपक्षाचं संपूर्ण सैन्य कापून काढल्यावर माणूस विजेता होतो. म्हणून काय शत्रुपक्षावर डागलेली अस्त्रं खरी नसतात. ही लुटुपुटूची लढाई असते आणि ती तितकीच लाइटली घ्यायची असते. पबजीमुळं घरदार सोडणारी माणसं वेडी ठरतात, पण अंतर्मनात विवेक जागा ठेवून केवळ मनोरंजन म्हणून खेळणारे असतातच की… ! तसेच आम्ही पट्टीचे खेळाडू… पण अर्थातच ऐतिहासिक! घटकाभर तुम्हाला आमचं भांडण खरं वाटलं ना ? साडेचार वर्षे करमुक्‍त मनोरंजन झालं की नाही?

आता मीडियावालेही आम्हालाच दोष देताहेत. नाही-नाही म्हणता म्हणता एकत्र आलातच ना, असं विचारताहेत. ज्येष्ठांनी हातमिळवणी केली म्हणून कार्यकर्त्यांची एकी होणार आहे का, असं विचारताहेत. कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांचं काम करणार का, अशी शंका उपस्थित करताहेत. पण याच मीडियावर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं, ऐकलंत ना? कार्यकर्ते म्हणाले, वरून जो आदेश येईल, तो फॉलो करणार. आदेशानुसार काम करणंसुद्धा ऐतिहासिकच. चला, विस्मृतीचे ऐतिहासिक दरवाजे उघडा आणि सगळं विसरण्याचं ऐतिहासिक काम करा!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)