ऐतिहासिक मस्तानी तलावाला पर्यटकांची आस

– महादेव जाधव

फुरसुंगी – मस्तानी तलावाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या राज्यकर्त्यांनी अनेकदा घोषणा केल्या, पाहणी केली, प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे या तलावाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास या बोटिंग, हॉटेलिंग, त्या अनुशंगाने अनेक व्यवसाय सुरू होऊन या भागाचा विकास होणार आहे. त्याचबरोबर हा ऐतिहासिक वारसा कायमचा जतन होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने हा मस्तानी तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दिवेघाटातील डोंगर दऱ्यांतून सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जागोजागी छोटेमोठे धबधबे ओसंडून वाहू लागल्याने व निसर्ग सौंदर्याने हा घाट नटल्याने पर्यटकांना आकर्षित करत आहे. या डोंगर दऱ्यांतून वाहणारे पाणी दिवेघाटाच्या पायथ्याशी वसलेला मनमोहक ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावात वळविल्यास तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास मदत होईल. तसेच, तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसीत केल्यास हा ऐतिहासिक वारसा कायमचा जतन होऊन स्थानिकांना विविध रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊन परिसराचा विकास होण्यास मदत होईल.

सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हडपसर-सासवड मार्गावरील निसर्गसौंदर्याच्या खाणीत वसलेल्या दिवेघाटातील डोंगर, दऱ्यांमधून धबधबे वाहु लागल्याने या घाटात सृष्टीने हिरवा शालु पांघरल्याप्रमाणे विलोभनीय दृष्य निर्माण झाले आहे. सर्वत्र लाल, पिवळ्या, निळ्या रंगांच्या रानफुलांनी डोंगररांगा बहरू लागल्या आहेत. सर्वत्र गर्द हिरवळ, खळखळणारे छोटेमोठे धबधबे, पाझरणारे डोंगर, झरे यामुळे या घाटमार्गातून जाताना निरस गारवा व मनाला आल्हाददायक समाधान मिळत असल्याने हा ऐतिहासिक दिवेघाट पर्यटकांना आकर्षित करत आहे. स्वच्छ खळाळणारे झरे यामुळे मन प्रसन्न होवून नेहमीच्या प्रापंचिक व व्यवहारीक दगदगीपासून निरस शांतता व प्रसन्नता मिळत असल्याने अनेक जण घाटातील निसर्ग व खळखळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. इतिहासप्रेमी व निसर्गप्रेमीही मस्तानी तलावाला भेट देत आहेत.

महान पराक्रमी शुरवीर बाजीराव पेशवे व अद्वितीय सौंदर्यवती मस्तानी यांच्या अमर प्रेमाची साक्ष देणारा हा विलोभनीय “मस्तानी तलाव’ पुरातत्व खाते व प्रशासनाच्या उदासीन वृत्तीमुळे पाणी व देखभालीअभावी पडझड होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातन दगडी बांधकाम करून चोहोबाजुंनी चिरेबंदी असलेल्या या तलावाच्या संरक्षक भिंती जागोजागी ढासळल्या आहेत.तलावात सर्वत्र झाडी झुडपी आली असल्याने तटबंदी ढासळत आहे. तलावात गाळ साचत असून तटबंदी ढासळल्यामुळे डोंगरावरील दगड गोटे, माती पडत असल्याने तलाव बुजला जात आहे. वडकी गावातून तलावाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. तलावात पाणी सोडण्यासाठी वडकीकरांनी अनेकदा मागणी करूनही प्रशासन कोणतीही उपाययोजना राबवत नसल्याचे दिसून येत आहे. तलावाच्या देखभालीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने याठिकाणी कोणाचेही नियंत्रण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)