ऐतिहासिक घंटेचा लंडन ते पुनवडी प्रवास 

140 वर्षापूर्वी चर्चसाठी तयार झाली होती ही घंटा 

सातारा – जावळी तालुक्‍यातील पुनवडी गावात भैरवनाथाच्या मंदिरासमोर सुमारे 100 किलो वजन असलेली ऐतिहासिक घंटा आढळून आली आहे. सन 1881 मध्ये लंडनमधील जागतिक कीर्तिच्या जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली आहे. 140 वर्षांपूर्वी लंडन ते पुनवडी असा या घंटेचा झालेला प्रवास मनोरंजक आहे. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर संशोधक विध्यार्थी महेश गुरव आणि मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी ही घंटा शोधून काढली आहे.

पुनवडी येथे गावाजवळ असणाऱ्या भैरवनाथाच्या मंदिरासमोर एका झाडावर भली मोठी घंटा टांगून ठेवली आहे. या घंटेचे वजन सुमारे 100 किलोहून अधिक आहे. घंटेचा परिघ सुमारे 80 इंच आहे. ही घंटा पंचधातूंपासून तयार करण्यात आली आहे. या घंटेकडे कोणाचे फारसे लक्ष नव्हते. सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर महेश गुरव आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी पुनवडी येथे जाऊन घंटेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ही घंटा ऐतिहासिक असल्याचे निदर्शनास आले.

या घंटेवर जिलेट ब्लेंड ऍन्ड कंपनी क्रायडॉन असे उठावदार इंग्रजी अक्षरात कोरले आहे. त्याचबरोबर घंटा तयार केल्याचे सन 1881 लिहिण्यात आले आहे. तर एका बाजूला मारूती लक्ष्मण पारटे अशी अक्षरे ठिपक्‍यांमध्ये कोरण्यात आली आहेत. प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी या घंटेचा सखोल अभ्यास केला असता मनोरंजक माहिती समोर आली. 140 वर्षांपूर्वी या घंटेचा लंडन ते पुनवडी असा झालेला प्रवास उलगडला गेला. ही घंटा लंडन शहराजवळील क्रायडॉन या शहरात जिलेट ब्लेंड ऍन्ड कंपनीने तयार केली आहे. या कंपनीची स्थापना सन 1844 मध्ये विल्यम जिलेट याने केली. पुढे 1854 मध्ये चार्लस ब्लेंड हा या कंपनीत भागीदार झाला. त्यानंतर या कंपनीचे नाव जिलेट ब्लेंड ऍन्ड कंपनी असे झाले. ही कंपनी चर्च आणि अन्य इमारतीवर असणाऱ्या मनोऱ्यातील घडयाळे आणि चर्चमध्ये वापरण्यात येणाऱ्या घंटेसाठी प्रसिध्द होती.

या कंपनीने जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी 20 टनाहून अधिक वजनाच्या स्मारक घंटा बनवून दिल्या आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी यांसह अन्य युरोपीयन राष्ट्रांत अनेक मोठ्या चर्च आणि स्मारकस्थळी या कंपनीच्या घंटा बसविण्यात आल्या आहेत. त्यावेळी ही जगातील सर्वांत मोठी घंटा तयार करणारी कंपनी होती. पुनवडी येथील घंटा ही याच जगप्रसिद्ध कंपनीने 1881 साली तयार केली. ही घंटा प्रामुख्याने चर्चसाठीच बनविण्यात आली होती. ती लंडनहून जहाजाने भारतात मुंबईत आली. यावेळी पुनवडी गावातील अनेक लोक मुंबईत कापड गिरण्या आणि बंदरावरील गोदीत कामास होते. ही घंटा विकण्यासाठी आल्यावर मुंबईत आलेल्या मारूती लक्ष्मण पारटे यांच्या निदर्शनास आली.

याचवेळी गावातील भैरवनाथाच्या मंदिरासाठी घंटा आणण्याचा गावकऱ्यांचा विचार सुरू होता. मारूती पारटे यांनी जहाजावरून विकण्यास आलेली ही भलीमोठी घंटा मंदिरासाठी विकत घेतली. 100 किलोहून अधिक वजनाची ही घंटा बैलगाड्यावर टाकून गावात आणण्यात आली. त्यानंतर ती भैरवनाथाच्या मंदिरात बसविण्यात आली. इंग्लंडमधील एका जगद्विख्यात कंपनीने 140 वर्षांपूर्वी तयार केलेल्या या ऐतिहासिक घंटेचा प्रवास मनोरंजक आहे.

या संशोधन कार्यात संशोधक विध्यार्थी राहुल गंगावणे, युवराज जाधव, पुजा दळे, नम्रता पिंपळे यांनीही सहभाग घेतला. या घंटेच्या शोधामुळे सातारा जिल्ह्याच्या इतिहासात मोठी भर पडली आहे. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष शरदराव चव्हाण, संघटक जयेंद्र चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रा. डॉ. डी.बी. गायकवाड प्रा. डॉ. आर. बी. सातपुते यांनी या संशोधन कार्याबद्दल प्रा. काटकर, कुमठेकर व संशोधक विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)