हिंगोली – शहरातील मस्तानशानगर भागात एका 24 वर्षाच्या ऑटोचालकाने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला. हिंगोली शहरातमस्तानशाहा नगरात ऑटोचालकाने गरिबीला कंटाळून मध्यरात्रीच्या सुमारास साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज रविवारी सकाळीच उघडकीस आहे.
किशोर भालेराव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कुटुंब चालवण्यासाठी तो ऑटो चालवण्याचा व्यवसाय करीत होता. पण दररोज म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याने संसार चालविण्यासाठी त्याला आर्थिक चणचण भासत होती. त्यात डिझेलच्या दरात होत असलेली वाढ व महागाईमुळे तो आणखीनच त्रस्त झाला होता. यामुळे किशोर हा आपल्याच धुंदीत वावरत होता.
दोन दिवसांपासून तो घरातील सदस्यांशीही म्हणावेत असे बोलत नव्हता. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील एका साडीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवार घटनास्थळी हजर झाले. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केली. त्यावर पंचनामा करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.