टॅम्पर : भारताची धावपटू हिमा दासने ‘सुवर्ण’मयी विक्रमाला गवसणी घातली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास घडवला.

दरम्यान, हिमा दासवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, “अभिनंदन हिमा दास, जागतिक ऍथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला! भारताला तुमच्याबद्दल अभिमान आहे. तू आम्हाला आमचे डोके उंच ठेवण्याचे एक कारण दिले आहे! जय हिंद!” भरताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर अश्या अनेक दिग्गज खेळाडू व अभिनेत्यांनी हिमा दासला शुभेच्छा दिल्या आहेत.

हिमा दासने चारशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत 51.46 सेकंदांची वेळ नोंदवली. 18 वर्षांची हिमा आसामची रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये ती सहावी आली होती. या स्पर्धेत रोमानियाची अँड्रिया मिकलोस हिने रौप्यपदक, तर अमेरिकेच्या टेलर मॅन्सन हिने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या नीरज चोप्राने 2016 साली या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत नवा विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर हिमा दासही नीरज चोप्राच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)