#क्रीडांगण: हिमा दासने रचला इतिहास 

अमित डोंगरे 
फिनलॅंड येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक मैदानी स्पर्धेत भारताच्या हिमा दास या अठरा वर्षींय खेळाडूने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच महिला धावपटू ठरली. 
चारशे मीटर शर्यतीत हिमाने 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. केवळ दोन वर्षांपूर्वी तिने धावपटू म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज सर्व भारतात तिचे नाव घराघरात पोचले आहे. खरे तर आसाममध्ये एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या हिमाला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती, पण कोणाच्या नशिबात काय परिवर्तन घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. खेडेगावात फुटबॉलसाठी आवश्‍यक मैदान, अकादमी या सुविधाच नसल्याने तिने मग मैदानी स्पर्धेत कारकीर्द घडावी यासाठी तयारी सुरू केली.
भाताच्या खाचरात हिमा फुटबॉल खेळत असताना तिच्या शाळेतील एका शिक्षकाने पाहिले आणि त्यांनी तिला फुटबॉलऐवजी मैदानी स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. तिची नीपोन दास यांच्याशी भेट घालून दिली. मैदानी स्पर्धेतील एकेकाळचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक नीपोन दास यांनी हिमा या हिऱ्याला पैलू पाडले. त्यांनी तिला गुवाहाटीतील त्यांच्या अकादमीत बोलावले. पण सुरुवातीला तिच्या पालकांनी त्याला विरोध केला. त्यांच्या गावापासून गुवाहाटी जवळपास दीडशे किलोमीटर लांब आहे. त्यामुळे ही एकटी मुलगी कशी तिकडे पाठवायची? असा विचार त्यांच्या मनात आल होता. मात्र नीपोन दास यांनी खात्री दिल्यानंतर हिमाचे पालक तयार झाले व हिमा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली. तिचा धावण्याचा वेग पाहून सहकारी खेळाडूच नव्हे, तर नीपोन दास देखील थक्क झाले. भारताला नवी पी. टी. उषा मिळाली आहे असे ते आज अभिमानाने सांगतात.
हिमा ही आसाममधील नगाव जिल्ह्यातील कांधुलीकारी या गावात राहते. तिचे वडील रणजीत दास शेतकरी आहेत, तर आई जुनाली शेतीच्याच कामात त्यांना मदत करते. हिमाला अजून तीन भावंडे आहेत. घरात एकूण सहा जणांचा परिवार राहतो आणि शेतीतील अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर त्यांची गुजराण चालते.
हिमाला आपल्या घरच्या परिस्थितीची चांगलीच कल्पना असून संपूर्ण कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढून एक सुखी आयुष्य देण्याचा ती प्रयत्न करत आहे. आता या जागतिक मैदानी स्पर्धेतील सुवर्ण पदकामुळे तिला आर्थिक संकटातून बाहेर पडायला मदत होणार आहे. आशियाई वा ऑलिंपिक या कशाचाही आता विचार न करता प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायचे आणि देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे; हा एकच निर्धार तिने केला आहे.
हिमाने मार्च महिन्यात पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले व त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेची पात्रतादेखील मिळवली. नुकत्याच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मात्र तिला अपयशाचा सामना करावा लागला. चारशे मीटर शर्यतीत ती सहाव्या स्थानवर राहिली, तर चार बाय चारशे मीटर शर्यतीत तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर मे महिन्यात राजधानीत झालेल्या इंडियन ग्रां प्री स्पर्धेतही शंभर मीटर शर्यतीत ती पाचव्या स्थानावर राहिली होती.
हे सलग येत असलेले अपयश तिला सलत होते. तिने पुन्हा अकादमीत जोरदार सराव सुरू केला. शारीरिक तंदरुस्तीवर भर दिला. श्‍वास किंवा दम रोखून धरत जास्तीत जास्त अंतर पार करण्याचाही तिने सराव केला आणि ती गुवाहाटीतच झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत उतरली. या स्पर्धेत अपयश मागे टाकत तिने चमत्कार घडवला. या स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत 51.13 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवत तिने सुवर्ण पदक पटकावले व हरवलेला फॉर्म आणि आत्मविश्‍वास परत मिळवला.
पी. टी. उषा. शायनी विल्यम्स्‌, सिमा पुनिया, ललिता बाबर, कविता राऊत यांच्यानंतर आता जागतिक मैदानी स्पर्धेच्या क्षितिजावर हिमा दास हिचा उदय झाला आहे. आज ती केवळ अठरा वर्षांची आहे, खूप मोठी कारकीर्द तिच्यासमोर आहे. तिचे वडील रणजित दास म्हणतात त्याप्रमाणे हिमा खूप हट्टी आहे. एकदा जर तिने एखादी गोष्ट करायची ठरवली, तर ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय तिला चैन पडत नाही. खऱ्या आणि कसोटीला उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हाच हट्ट एका सामान्य खेळाडूपासून असामान्य खेळाडू बनवत असतो.
पायोली एक्‍सप्रेस पी. टी. उषा हीच तिची आदर्श आहे. त्यामुळे तिच्यासारखेच, किंबहुना तिच्यापेक्षाही जास्त यश हिमा मिळवेल असा विश्‍वास वाटतो. मात्र हिमाला आता खरी गरज आहे सरकारी राजाश्रयाची. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने टी.ओ.पी. (टार्गेट ऑलिंपिक पोडीयम) हा जो उपक्रम हाती घेतला आहे; त्यात हिमाचा समावेश करून एक चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तिला पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती देखील मिळेल. सरकारी कोट्यातून तिला घर मिळावे आणि ते देखील दिल्ली किंवा गुवाहाटीत. जेणेकरून ती अकादमीत जास्तीत जास्त सराव करू शकेल. प्रायोजकांनीही पुढे येऊन तिला मदतीचा हात दिला, तर जगभरात होणाऱ्या विविध मैदानी स्पर्धांमध्ये तिला सहभागी होता येईल. यामुळे तिला आशियाई, आफ्रो-आशियाई आणि नंतर ऑलिंपिक स्पर्धेची संधी मिळेल. ऑलिंपिक स्पर्धा 2024 हे लक्ष्य ठेवून हिमाला जर तयार केले, तर भारताला मैदानी स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून देण्याची तिची निश्‍चितच क्षमता आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)