भेसूर चेहरा (अग्रलेख)

पीडीपीची प्रतिमा दहशतवाद्यांप्रती सहानुभूती बाळगणारा पक्ष अशीच राहिली आहे. त्यामुळे शस्त्रसंधीसाठी केलेला आग्रह हा बुऱ्हान वाणीच्या चेल्यांना फेरजुळणीकरता उसंत मिळावी यासाठीचा तर नव्हता, अशी शंका व्यक्त होत असतानाच, मेहबुबांनी असे वादग्रस्त वक्‍तव्य करणे, हा योगायोग त्यांच्या पक्षाचा भेसूर चेहरा उघड करणारा ठरला आहे. त्यातून आगामी काळातील वाढत्या धोक्‍याची सूचना दिली आहे. ती दुर्लक्षून चालणार नाही.

सारख्या विचारांचे लोक एकत्र आले तर त्यात काही अर्थ असतो. ती मैत्री जास्त काळ टिकते हे तरे खरेच; पण समजा, ती तुटली तरी त्यातून उणीदुणी काढून परस्परांचे ओंगळ रूप उघड करून आपलाच विकृत आणि भेसूर चेहरा जगासमोर आणण्याचा आत्मघाती प्रकार होत नाही. त्यामुळे समविचारी लोकांशीच मैत्री केली जावी किंवा केली जाते. दोन टोके मैत्रीच्या नावाखाली जर एकत्र आली तर मग मात्र वर उल्लेख केलेले सर्व प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे जो सगळ्यांत जवळचा मित्र असतो अथवा काही काळासाठी का होईना झाला असतो, त्याचे शत्रुत्व नंतरच्या काळात सगळ्यांत घातक ठरत असते. त्याची चुणूक जम्मू-काश्‍मीर या राज्याच्या निमित्ताने संपूर्ण देशाला आता दिसू लागली आहे.

मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या कन्या मेहबुबा मुफ्ती यांनी पित्याच्या निधनानंतर बराच काळ दुखवटा पाळला. त्या दरम्यानच्या काळात पडद्यामागे आपले काय आणि आपल्याला काय, याची गणिते मांडली आणि जुळवली. नंतर किमान सर्वाधिक लाभाची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी राज्याची धुरा सांभाळण्याची व त्याकरता भाजपाशी घरोबा करण्याची तयारी केली व त्यांचे सरकार सत्तेवर आले. संपूर्ण देशाला कॉंग्रेसमुक्‍त करण्याच्या कथित महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या भाजपने देशाचे अवघड जागेचे दुखणे ठरलेल्या जम्मू-काश्‍मीरमध्ये राज्य करायची संधी न सोडण्याचा अघोरी विचार केला आणि तो अंमलात आणला. स्वत:ला संपूर्ण राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या आणि “राष्ट्र सर्वोपरी’ या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या भाजपने खरेतर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक अर्थात पीडीपीशी केलेली युती राजकारणाचा सुमार आणि अत्यंत खालचा दर्जा दर्शविणारी होती.

मात्र जम्मू-काश्‍मीरला भारतीयांच्या नजरेत असलेले महत्त्व आणि जागतिक स्तरावर या भूभागाकडे विदेशी हितचिंतकांची कायम असलेली नजर या पार्श्‍वभूमीवर न पटणारी आणि त्याहूनही मुळातच न मानवणारी युती या राज्यात पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंकडच्या विचारी मंडळींनी तत्त्वांना मुरड घालत हा संसार चालावा, याकरता विघ्न न घालण्याचे पथ्य काही काळ पाळले. पण स्वभावाला औषध नसते. विचार एक वेळ बदलूही शकतात. संस्कार बदलणे फारच अवघड. मेहबुबांचे राजकीय संस्कार वेगळे. त्यातूनच आपणच संपूर्ण जम्मू-काश्‍मीरचा कैवार घेतल्याचा त्यांना झालेला साक्षात्कार. राज्यातील निःशस्त्र सरळमार्गी जनता जशी आपली, तसेच दगडफेक करणारे माथेफिरू आणि त्याही पलीकडे थेट हातात शस्त्रे घेऊन लष्करावर गोळीबार करणारे देशद्रोहीही आपलेच ही त्यांची उदात्त भावना. एकदा मोठेपण घेतले की काही यातनाही त्यासोबत सोसाव्या लागतात. मेहबुबांनी त्या अर्थातच सोसल्या. टीका-टिप्पणी आणि अन्य कशालाही भीक न घालता त्यांनी रमजानच्या काळात देशद्रोह्यांसोबत शस्त्रसंधी करण्याचा आपला हट्ट दिल्लीश्‍वरांकडून पुरवून घेतला.

मघाशी म्हटल्याप्रमाणे जम्मु काश्‍मीरला असणाऱ्या अनन्यसाधारण महत्वामुळे केंद्रीय सत्ताधाऱ्यांना या राज्याचे असले फाजील लाड पुरवण्याची उमळ येतच असते. त्यात सध्याचे दिल्लीश्‍वर तर अतिआत्मविश्‍वासाची निसर्गदत्त देणगी लाभलेले. त्यांनी आणि त्यांच्या शिलेदारांनी शस्त्रसंधी एकतर्फी जाहीर केलीच, पण माध्यमातून वकिली युक्‍तिवाद करत त्याचे समर्थनही करत राहिले. या दरम्यानच्या काळात देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेले जवान आपल्या प्राणांचे बलिदान देत राहिले. अनेक राज्यांतून या शहीद जवानांच्या अंत्ययात्रा निघाल्या. अखेर उपरती झाल्यामुळे म्हणा की ब्रह्मसाक्षात्कार, शस्त्रबंदीचा निर्णय फिरवण्यात आला. त्यामुळेच पीडीपी- भाजप वादाची ठिणगी पडली व संसार उद्‌ध्वस्त झाला. हे असेच होणार होते. तरीही फाजील प्रयोग केला गेला व त्याकरता लष्कराचे मनोधैर्य, प्रतिष्ठा पणाला लावली गेली.

सत्ता गेल्यावर एकमेकांची लायकी काढण्याची चुरस निर्माण होते. भाजपने जाहीरपणे जरी काही केले नसले तरी मेहबुबा यांनी मात्र फार पुढची मजल मारली आहे. “दिल्लीने जर 1987 च्या काळाप्रमाणे काश्‍मीरी मतदारांचे अधिकार धिक्कारण्याचा आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यापेक्षाही गंभीर स्थिती आता निर्माण होउ शकते. त्यातून सलाहुद्दीन आणि यासिन मलिक जन्माला येतील,’ अशा आशयाची थेट धमकीच त्यांनी दिली. हातातून गेलेले राज्य आणि सत्तेतून बेदखल झाल्यामुळे अनुयायांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यातून परक्‍याशी संधान साधण्याचा त्यांचा सुरू असलेला आटापीटा, यामुळे मेहबुबा भयभीत झाल्या आहेत.

व्यक्‍ती जेव्हा स्वत: घाबरते तेव्हा ती सामूहिक घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यातलाच मेहबुबा यांचा हा प्रकार. हिज्बुलच्या सलाहुद्दीनचे उदाहरण त्यांनी दिले आहे. त्यातून काय चुकीचा संदेश आपण दिलाय याची आता त्यांना कल्पना नसेल अशातला भाग नाही. मात्र सत्ता आणि अधिकार आणि इतर काही स्वार्थ यापुढे अन्य बाबी गौण आणि खुज्या ठरतात. वास्तविक पीडीपीची प्रतिमा दहशतवाद्यांप्रती सहानुभूती बाळगणारा पक्ष अशीच राहीली आहे. त्यामुळे शस्त्रसंधीसाठी केलेला आग्रह हा बुऱ्हान वाणीच्या चेल्यांना फेरजुळणीकरता उसंत मिळावी यासाठीचा तर नव्हता, अशी शंका व्यक्त होत असतानाच, मेहबुबांनी असे वादग्रस्त वक्‍तव्य करणे, हा योगायोग त्यांच्या पक्षाचा भेसूर चेहरा उघड करणारा ठरला आहे. त्यातून आगामी काळातील वाढत्या धोक्‍याची सूचना दिली आहे. ती दुर्लक्षून चालणार नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित व्हावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)