राजस्थानप्रमाणे राज्यात हेरिटेज हॉटेल संकल्पना

ना. जयकुमार रावल : नगरच्या भुईकोट किल्ल्यासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी

वाफेवर चालणारी रेल्वे सुरू करा ः गांधी
भुईकोट किल्याच्या खंदकात रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. वाफेवर चालणारी छोटी रेल्वे या ठिकाणी सुरू करता येणे शक्‍य आहे. यासह या ठिकाणी रोप वे आणि शहराजवळील 9 वास्तूचे पर्यटनाच्यादृष्टीने विकास व्हावा, अशी मागणी माजी खा. दिलीप गांधी यांनी केली.

नगर – राजस्थानच्या धर्तीवर नगरसह राज्यात हेरिटेज हॉटेल पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार आहे. यातून येणाऱ्या उत्पन्नातून संबंधित किल्ल्याची डागडुजी आणि व्यवस्थापन ठेवण्यात येणार आहे. नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या विकास कामासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्‍वासन पर्यटन आणि अन्न, औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पर्यटनमंत्री रावल शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर होते. नगरच्या भुईकोट किल्ला या ठिकाणी भेट देत अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना दिल्या. यावळी आ. शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले, अर्थसंकल्पात पर्यटन विभागाला कमी निधी मिळतो. मिळणाऱ्या निधीतून गरज असणाऱ्या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी अधिका अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नगरच्या भुईकोट किल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता आहे. मात्र, या ठिकाणी सैन्य दलाचे कार्यक्षेत्र असल्याने आवश्‍यक कामे सूचवा, त्यासाठी तातडीने निधी देण्यात येईल. जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांनी किल्ल्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी 50 लाखांचा निधी मिळालेला आहे. मात्र, या ठिकाणी दीड कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आलेली आहेत.

मंत्री रावल यांनी मागील 1 कोटींची देणी, नव्याने लाईटसाठी 40 लाख, 20 लाख रुपयांची ऑडीओ बुक आणि 3 लाख रुपये शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा नकाशे तयार करण्यासाठी देण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. या ठिकाणी विकास कामे अथवा डागडुजी करतांना हेरिटेरीजमधील तज्ज्ञांनी नेमणूक करून कामे करावीत, हे कामे ठेकेदारांची नाहीत.

किल्ल्याचा विकास करतांना अधिका अधिक नगरकर या ठिकाणी येवू शकतील अशा कामांना प्राधान्य द्यावे, शहरचा पर्यटनाचा नकाशाच तयार करावा आणि त्याचे शाळा- महाविद्यालयात वितरण व्हावेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पर्यटन पर्व सुरू व्हावे, बाहेरचे सोडा आधी शहरातील सर्व लोक या ठिकाणी पर्यटनाला कसे येतील याची सोय करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील काही निवडक किल्ले सोडले तर अन्य ठिकाणी पर्यटन वाढीच्या दृष्टीने हेरिटेज हॉटेल पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात असे काही किल्ले असून नगर जिल्ह्यात मांजरसुंभे गडावर देखील ही संकल्पना राबविता येवू शकते असे त्यांनी स्पष्ट केले.

जंक फूडमुळे तरुण डायबिटीसच्या उंबरठ्यावर
देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्याने शाळा आणि महाविद्यालय परिसारात जंक फूडवर बंदी घातली आहे. जंक फुडमुळे देशातील 30 तरूण हे डायबिटीसच्या उंबरठ्यावर आहेत. जंक फूड विरोधात प्रत्येक शाळेत एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासह महाविद्यालयाच्या कॅंटींगमध्ये स्वच्छतेसह खाद्य पदार्थाचा मेनूगाईड तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे पर्यटक दूत आणि पर्यटक अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून पर्यटनचा विकास व्हावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)