मथुरेत कृष्णाचे दर्शन घेऊन हेमामालिनींनी दाखल केला अर्ज

मथुरा: भारतीय जनतापक्षाच्या मथुरा मतदार संघातील उमेदवार अभिनेत्री हेमामालिनी यांनी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या समवेत मथुरेतील मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि तेथे पुजा करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मथुरा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 70 वर्षीय हेमामालिनी तेथे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय लोकदल पक्षाचे उमेदवार जयंत चौधरी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पक्षाने त्यांना फतेहपुर सिक्री मतदार संघातून यावेळी उमेदवारी देण्याचा विचार केला होता पण त्यांनी मथुरा मतदार संघाचाच आग्रह धरला. राधा कृष्णाच्या भूमीतूनच आपल्याला पुन्हा निवडणुक लढवायची आहे अशी गळ त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला घातल्यानंतर त्यांचा हा आग्रह मान्य करण्यात आला. आज मथुरेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला येथून उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

मथुरेचा विकास करण्यासाठीच आपण पुन्हा निवडणूक लढवत आहोत असे त्या म्हणाल्या. येथील लोकांना मी मतदार संघात केलेले काम माहिती आहे त्यामुळे ते आपल्यालाच पुन्हा निवडून देतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांची या मतदार संघात महागठबंधनचे उमेदवार कुँवर नरेंद्र सिंह यांच्याशी प्रमुख लढत होईल ते राष्ट्रीय लोकदल पक्षाच्यावतीने ही निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेसने येथे महेश पाठक यांना उमेदवारी दिली आहे. ते उद्योगपती आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)