प्रेरणा : निराधार आजीला समाजसेवकांची मदत… 

दत्तात्रय आंबुलकर 

आजही प्रसंगी पोटच्या मुलांनी पोरके व बेघर केलेल्या वृद्ध व गरजू माता-पित्यांना “कुणी घर देता का घर’ अशी पोटाला पिळवून टाकणारी हाक द्यावी लागते अशा विपरित सामाजिक पार्श्‍वभूमीवर यवतमाळच्या बसस्थानकावर मात्र एक शंभर वर्षांच्या निराधार आजीची मूक साद येथील तरुणांना ऐकू गेली. याच हाकेला प्रतिसाद म्हणून तेथील “प्रतिसाद’ फाउंडेशन नावाने समाजकार्य करणाऱ्या या तरुणांनी या आजीला जो आसरा दिला त्याचीच ही कथा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका रात्री 11.30 वा. यवतमाळ बस स्थानकावर एक गरजू व शंभरी ओलांडलेली आजी थंडीत कुडकुडत असल्याचे प्रतिसाद फाउंडेशनच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्यावर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक प्रतिसाद देत त्या आजीला आधार देत वृद्धाश्रमात पोहोचविले.

वयोवृद्ध आजीला एकटी व थंडीत कुडकुडत असल्याचे बघून प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांची पहिले आपुलकीने विचारपूस करून त्या उपाशी असल्याचे लक्षात येताच त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली व त्यांच्याकडे विचारपूस करता आजींनी स्पष्ट केले की, त्या वर्धा येथील राहणाऱ्या. तिथे त्यांच्या पतीचे घर व दोन मुले आणि मुलगी असा संसार आहे. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार मुले बदलली, ते जन्मदात्या आईला मारहाण करूनच थांबले नाहीत तर त्यांनी पहिले आपल्या वडिलांच्या मालकीचे राहते घर तर विकलेच, शिवाय त्यानंतर जबरदस्ती करून आईला घराबाहेर काढण्याचा कळस गाठला. निराधार अवस्थेत त्या औरंगाबादला आपल्या मुलीकडे आसऱ्यासाठी गेल्या, पण अल्पावधितच त्यांच्या जावई व मुलीने त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढले व परत जाण्यासाठी यवतमाळच्या बसमध्ये बसवून दिल्याने त्या यवतमाळ स्थानकावर पोचल्या.

“प्रतिसाद’च्या कार्यकर्त्यांनी त्या वृद्धेची अवस्था पाहता व वय आणि अशक्तपणा लक्षात घेता त्यांना प्राथमिक उपचारांसाठी तातडीने यवतमाळच्या साईश्रद्धा रुग्णालयात दाखल केले. आराम वाटल्यावर त्यांना शहरातील वृद्धाश्रमात दाखल केले. “प्रतिसाद’च्या कार्यकर्त्यांनी शंभरी गाठलेल्या व गरजू आणि निराधार आईला सामाजिक प्रतिसादाद्वारे अशा प्रकारे कृतिशील आधार पण दिला.

माणुसकीचे असे दर्शन आजच्या काळात दुर्लभ झाले असल्याने, “प्रतिसाद’च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. वृद्ध व्यक्ति म्हणजे घरातील अडचण असे समजून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या मुला-बाळांची मानसिकता नक्‍की काय असते, ते समजत नाही. मात्र, आजही अशा समाजसेवी संस्था दिसल्या, की मन द्रवतेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)