जीवनगाणे: मदतीचा हात

अरुण गोखले

एक गजबजलेला आणि तुफान वेगाने वाहणारा रस्ता. त्या रस्त्यावर तुमच्या आमच्यासारख्या धडधाकट आणि डोळस लोकांना जीव मुठीत धरून तो रस्ता ओलांडायचा म्हणजे एक दिव्य कसरत वाटत होती. त्याच प्रचंड वाहनांच्या वाहत्या रस्त्यावरून एक आंधळा आणि एक पांगळा असे दोनजण मात्र स्वत:ची नीट काळजी घेत आणि इतरांनाही जरासुद्धा अडचण न करता आपला रस्ता ओलांडण्याचे काम करीत होते. ती त्यांची तशी परस्परांच्या उणिवा भरून काढत सहकार्याने आणि मदतीच्या भावनेने चाललेली बोलकी कृती पाहिली आणि मला शालेय जीवनात कुठेतरी वाचलेल्या त्या कवितेच्या चार ओळी पुन्हा आठवल्या. जणू काही हेच शब्द चित्र रेखाटताना तो कवी म्हणतो,

आंधळ्याची वाट चाले, पांगळ्याची दिव्य दृष्टी।
पांगळ्याची वाट चाले, आंधळ्याची स्नेह काठी।।

खरचं किती यथार्थ वर्णन आहे हे. एकाला दिसत नाही तर दुसरा पायाने अधू आहे, अपंग आहे म्हणून त्याला नीट चालता येत नाही. पण हे असं असलं तरी त्यांची जगण्याची आणि सहकार्याने दुसऱ्याला जगवण्याची उमेद मात्र मेलेली नाही. आंधळ्याला पांगळा रस्त्यातले धोके सांगतोय आणि पांगळ्याच्या हातातली स्नेहकाठी आंधळ्याला सांभाळून नेतेय. या अशा जीवांना जीवनाशी हे असं झगडताना पाहिलं ना की खरंच त्यांच्या जिद्दीला सलाम करावा असं वाटत.

नाही तर दुसरीकडे जीवनात नैराश्‍य आले, अपयश आले, नुकसान झाले, साथ सोबत सुटली म्हणून जीवनाला कंटाळलेली, हताश, झालेली, खचलेली आणि मरणाला सामोरी जाणारी माणसं आहेतच की.

खरं म्हणजे खरा माणूस तो जो प्राप्त परिस्थितीशी झगडतो. आपण न नमता तिला हर प्रयत्नाने आपल्या पायाशी झुकवतो. जो लढतो तो एक ना एक दिवस यशस्वी होतोच, पण जो प्रयत्नाआधीच, लढण्याआधीच, हार मानतो तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही. तो मिळालेले जीवन जगत नाही, जगण्यातला आनंद घेत नाही. तर मरण्याआधीच मरत असतो. खरंच आपण सारेजण जर एकमेकांच्या उणिवा ओळखून परस्पर सहकार्याने अडचणी दूर करत हा जीवनसंग्राम लढत राहिलो, तर एक से भले दो असं नक्‍कीच अनुभवायला मिळेल. सहकार्याचं आणि मदतीचं मोल माणसाला जाग करून जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)