“हॅलो फॉरेस्ट’… डायल 1926; वनविभागाशी संपर्क

– गायत्री वाजपेयी

पुणे – रस्त्यावर आढळलेल्या एखाद्या जखमी वन्यप्राण्याची माहिती, प्राणी तस्करीबाबत सूचना देणे, वणवा, वृक्षारोपण यांसारख्या असंख्य विषयांसंदर्भात वनविभागाशी संपर्क साधण्यासाठी 1926 या क्रमांकाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो. “हॅलो फॉरेस्ट’ हा उपक्रम राबविणारा राज्याचा वनविभाग हे देशातील पहिलाच विभाग आहे.
“हॅलो फॉरेस्ट’ उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता, देशभरातील वनांसंदर्भात माहिती व तक्रारींसासाठी 1926 हा क्रमांक लागू करायचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे लवकरच राज्याचा माहिती क्रमांक हा देशभरातील क्रमांक बनण्याची शक्‍यता आहे.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 2016 साली या विनाशुल्क माहितीक्रमांक उपलब्ध करण्यात आला. राज्यभरातून या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात फोन येत असतात. विभागाच्या या “कॉल सेंटर’चे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर राज्यात विभागाच्या सर्व “सर्कल्स’मध्ये ही सेवा उपलब्ध आहे. यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांना प्राथमिक अधिकारी उत्तरे देतात. जर त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नसेल, तर त्या विषयावरील तज्ज्ञ व्यक्तींकडे तो “कॉल ट्रान्सफर’ केला जातो. या उपक्रमामुळे वन आणि वन्य प्राण्यांच्या संदर्भात असलेल्या समस्यांबाबत लवकरात लवकर माहिती मिळून, त्याबाबत अधिक चांगले काम करता येते.

या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्यानेच, हा उपक्रम देशपातळीवर राबविल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, असा प्रस्ताव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावाबाबत केंद्रीय मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)