#चिंतन: नैतिक उंची (भाग २)

डॉ. दिलीप गरूड 
कुणाच्या शिक्षण संस्थेला मान्यता हवी होती. कुणाला शाळेसाठी अनुदान हवे होते. कुणाला सरकारी कोट्यातून फ्लॅट हवा होता. कुणाला मुख्यमंत्री निधीतून मदत हवी होती. तर कुणाला नोकरी, तर कुणाला महत्त्वाच्या जागेवर बढती हवी होती. अनेकांची अनेक कारणे होती. त्यासंबंधीच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर होत्या. फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली की काम फत्ते होणार होते. म्हणून अनेकजण मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर बसून होते.
प्रधान सरांनी केबिन बाहेरची ही गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा बेत रद्द केला. ते स्वीय सहायकाला म्हणाले,
“”अरे चंद्रकांत, इथं गर्दी फार आहे. आपण नंतर भेटायला येऊ.” त्यावर चंद्रकांत म्हणाला, “”सर, आत चिठ्ठी तर पाठवा. आत झटपट बोलावलं तर भेटू; नाही तर जाऊ निघून.” मग प्रधान सरांनी क्षणभर विचार केला. नंतर स्वतःच्या नावाची चिठ्ठी लिहिली.केबिनबाहेरच्या चोपदाराने ती चिठ्ठी आत पोहोचवली.
ती प्रधान सरांची चिठ्ठी आत पोहोचताच चमत्कार घडला. अंगठा आणि तर्जनी या दोन बोटांत ती चिठ्ठी धरून स्वतः मुख्यमंत्री केबिनबाहेर आले. मुख्यमंत्री बाहेर येताच बाहेर ताटकळत बसलेले लोक क्षणात उठून उभे राहिले. त्या लोकांनी हसून मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांनी प्रति नमस्कार केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचे डोळे प्रधान सरांना शोधत होते. प्रधान सर दृष्टीस पडताच, मुख्यमंत्री म्हणाले,
“”अहो प्रधान, तुम्ही कशाला तसदी घेतलीत?” नंतर सभोवातल्या लोकांकडे पाहून मुख्यमंत्री म्हणाले, “”यांना माझ्याकडून काही ना काही अपेक्षा असतात. तुमचं तसं नाही. तुमच्यासारखी बोटावर मोजण्याइतकी समाजवादी मंडळी आहेत, त्यांना स्वतःसाठी काही नको असतं. ते समाजासाठी मागतात. तुम्ही दहा पैशांचं कार्ड जरी टाकलं असतं, तरी ते पाहून तुम्ही स्वतः आलात असं मी समजलो असतो.”
नंतर माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हसत हसत प्रधान सरांना हाताला धरून केबिनमध्ये नेलं. दोन महान व्यक्तींची सदिच्छा भेट झाली. जणू रामलक्ष्मणाची भेट. भेट घेऊन प्रधान सर हसत हसत बाहेर पडले, तेव्हा केबिनबाहेर मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी म्हणून वाट पाहणाऱ्या मंडळींना प्रधान सरांची नैतिक उंची उमगली. ती उंची शारीरिक उंचीच्या कितीतरी पट मोठी होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)