दिलदार मनाचा दमदार राजा..!

संग्रहित छायाचित्र

तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची सातारा ही गादी. याच मराठ्यांच्या राजधानीत, छत्रपतींच्या राजघराण्यात सर्वगुणसंपन्न, विनयशील, संयमी आणि चारित्र्यवान अशा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या समाजसेवेच्या, जनसेवेच्या मार्गावरील अखंडीत वाटचाल सातत्याने आहे. शांत, संयमी, निगर्वी, अभ्यासू, कृतीशील, विनम्र आणि जनसेवेसाठी तत्पर अशा अनैक पैलूंनी घडलेल्या या दिलदार मनाच्या दमदार राजाचा आज वाढदिवस. त्यानिमित्त…

अमर मोकाशी, जनसंपर्क अधिकारी (सुरुचि, सातारा)
स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले आणि स्व. राजमाता श्रीमंत छ. अरुणाराजे भोसले यांचे शिवेंद्रसिंहराजे हे सुपुत्र. राजघराण्यात जन्म झाला पण, त्या राजेपणाचा वागण्यात लवलेशही कोणी पाहिला नाही असा राजा म्हणजेच आ. शिवेंद्रसिंहराजे होय. लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर धावणे, सायकलिंग आणि व्यायामाचा छंद जोपासणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांनी आजही धावणे आणि सायकलिंगचा छंद जोपासून आजच्या युवापिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. समाजकारण, राजकारणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, सहकार अशा सर्व क्षेत्राला बळकटी देण्याचे महान कार्य या उमद्या, कार्यगुणसंपन्न, निगर्वी मनाच्या राजाने अविरतपणे सुरु ठेवले आहे.

स्व. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर अजिंक्‍य उद्योग समुहाची आणि सातारा-जावली तालुक्‍याच्या राजकारणाची आणि समाजकारणाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जुन्या, जाणत्या, जेष्ठ कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आपले समाजकार्य अखंडपणे सुरु ठेवले आहे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण, अनंत अडचणींवर मात करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अल्पावधीत जनसामान्यांमध्ये अढळ स्थान निर्माण केले आणि आपले कार्यकर्तुत्व सिध्द करुन दाखवले आहे. यापाठीमागे त्यांनी घेतलेले कष्ट, जनसामान्यांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठीची तळमळ ही प्रमुख कारणे आहेत.

आपण छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील आहोत, त्यांचे वारस आहोत असा डामडौल कधीही न मिरवता आ. शिवेंद्रसिंहराजे हे नेहमीच एक सामान्य माणूस म्हणून सदैव जनसेवा करीत राहिले आणि आजही करत आहेत. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याबद्दल जनसामान्यांच्या मनात एक वेगळीच आपुलकी आणि प्रेमभाव नेहमीच पहायला मिळतो. जनसामान्यांच्या सुख-दु:खात, प्रत्येक घडामोडीत सक्रीय सहभाग घेवून लोकांच्या आनंदाला द्विगुणीत करणारा तर, दु:खावर फुंकर मारुन लोकांच्या चेहऱ्यावर स्मित उजळवणारा राजा, अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी काय असतो हे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पुरग्रस्त, जळीतग्रस्त, धरणग्रस्त, आपत्तीग्रस्त लोकांना शासनाच्या तुटपुंज्या मदतनिधीवर अवलंबून न ठेवता स्वत: खिशातून आर्थिक मदत, आवश्‍यक साहित्य, धान्य अशा माध्यमातून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी असंख्य लोकांना मदतीचा हात दिला आहे. अपंग आणि दिव्यांग लोकांना स्वखर्चाने व्हील चेअर, वॉकर, कुबड्या, जयपूर फूट यासह जीवनावश्‍यक वस्तूही दिल्या आहेत. ही मदत करताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणूनच हे कार्य करतो. तुमाचा पाठिंबा मला हवा यासाठी नव्हे तर, तुमचा आशिर्वाद मला मिळावा म्हणून मी हे काम करतो, असे आदराने आणि विनम्रपणे नमूद करणारा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणजे आ. शिवेंद्रसिंहराजे आहेत.

आज राजकारणासाठी कोणीही कुठल्याही थरापर्यंत जातात, याची अनेक उदाहरणे सातत्याने पहावयास मिळतात. आ. शिवेंद्रसिंहराजे मात्र स्वाभिमान आणि तत्वाशी बांधलेले राजकारणी आणि समाजकारणी म्हणून ओळखले जातात. लोकांना भुलवत ठेवण्यापेक्षा काम होत असेल तर हो आणि होत नसेल तर नाही, असे स्पष्टवक्‍तेपण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पहावयास मिळते. जेष्ठांचा मानसन्मान करणारा, तरुणांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. स्वार्थी राजकारणासाठी दारु आणि मटणापायी युवापिढी बरबाद होताना दिसते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र युवापिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम सातत्याने केले आहे. निवडणुकीपुरते राजकारण आणि आयुष्यभर समाजकारण हे ब्रीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी युवा कार्यकर्त्यांच्या हाताला काम देवून युवापिढीला बळकट करण्याचे काम अखंडीतपणे सुरु ठेवले आहे. त्यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याजवळ युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ पहावयास मिळते.

कोणतेही काम करण्याची धमक असलेला, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा, संकटात प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा एक जवळचा मित्र, अशी या दिलदार राजाची ओळख जनसामान्यांमध्ये आहे. या दिलदार मनाच्या दमदार राजाकडून अखंडपणे जनसेवा घडो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजा भवानीकडे प्रार्थना. अशा या माझ्या राजाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)