नवी दिल्ली – आपला राजीनामा मंजुर करावा अशी मागणी करणारी याचिका कर्नाटकच्या आणखी पाच आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. या आधी आघाडीच्या बंडखोर आमदारांपैकी दहा आमदारांनी आपले राजीनामे मंजुर करावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका सादर केल्या होत्या. त्यामुळे असा अर्ज करणाऱ्या आमदारांची संख्या आता पंधरा झाली आहे.
या दहा आमदारांच्या बरोबरीनेच आमचीही याचिका विचारार्थ घ्यावी अशी मागणी या पाच बंडखोर आमदारांच्यावतीने त्यांचे वकिल मुकुल रोहितगी यांनी केली. त्यावर उद्या मंगळवारी सुनावणी घेऊ असे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 12 तारखेला या आमदारांच्या बडतर्फी विषयी अथवा त्यांच्या राजीनाम्याविषयी कोणताही निर्णय 16 जुलै पर्यंत घेऊ नये अशी सुचना कर्नाटक विधानसभेच्या सभापतींना केली आहे.