पुणे – सीमी संघटनेच्या बंदीबाबत पुणे शहरात दि. 3 व 4 मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. सीमी संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्य न्यायाधिकरणाचा हा पुणे दौरा असणार आहे. न्यायाधीश मुक्ता गुप्ता व ऍडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद तसेच वरिष्ठ वकिल व विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत येणार आहेत. दोन दिवसांत सीमी संघटनेच्या बंदीबाबत सुनावणी होणार आहे. या न्यायाधिकरणामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुनावणी होणार आहे. यावेळी ज्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शपथपत्रासह न्यायाधिकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर यांनी केले आहे.