धुळे – जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींचे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलेले असताना, आज या प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली आहे. धुळे विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीळकंठ यांची तब्येत ठीक नसल्याने त्या आज रजेवर होत्या.
त्यामुळे न्यायाधीश एस. उगले यांनी आता 27 जून ही तारीख दिली आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश असून विधानसभाही आता तोंडावर असल्याने त्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह जवळपास सर्वच आरोपी आज न्यायालयात हजर होते. यापूर्वी 21 मे रोजी निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र अजय जाधव आणि अरुण शिरसाळे हे दोन आरोपी गैरहजर राहिल्याने त्यांना आज 4 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष सुटतील, असा विश्वास आरोपींच्या वकिलांनी व्यक्त केला जात आहे.
तर दुसरीकडे या सर्व प्रकरणात शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकारी पक्षाने एकूण 50 साक्षीदार तपासून मोठ्या प्रमाणावर पुरावे सादर केले आहेत. या सर्व बाबीचा बारकाईने अभ्यास करुन न्यायालय योग्य निकाल देईल. ही आम्हाला आशा असल्याचे सरकारी वकिलानी म्हटले आहे.