निरोगी हिरड्या निरोगी दात

डॉ. निखिल देशमुख, दंतवैद्यक  

दातांच्या आरोग्याची काळजी घेताना हिरड्यांचीही काळजी घेणे आवश्‍यक असते. कारण हिरड्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच दातही मजबूत राहतात. दात कितीही चांगले असले तरी हिरड्या खराब असतील तर दात खराब होण्याचा धोका नेहमीच राहातो. सुरुवातीला हिरड्यांना सूज येते आणि काही काळानंतर दात हलणे सुरू होते. अशा स्थितीत दातांची योग्य देखभाल केली नाही तर दात पडायला सुरुवात होते.  हा शरीरातील अधिक महत्त्वाचा न वाटणारा भाग असला तरी आरोग्यासाठी दातांचे महत्त्व खूप जास्त आहे. दातांशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. दात नेहमीच मजबूत आणि स्वस्थ राहावेत अशी इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, त्यासाठी दातांच्या देखभालीची गरज असते आणि दातांबरोबरच हिरड्यांची देखील देखभाल आवश्‍यक असते.

कारण हिरड्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच दातही मजबूत राहतात. दात कितीही चांगले असले तरी हिरड्या खराब असतील तर दात खराब होण्याचा धोका नेहमीच राहातो. सुरुवातीला हिरड्यांना सूज येते आणि काही काळानंतर दात हलणे सुरू होते. अशा स्थितीत दातांची योग्य देखभाल केली नाही तर दात पडायला सुरुवात होते. दात हालत नसतील तरीही कुठल्याना कुठल्या त्रासाला सामोरे जावे लागते. तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून राक्‍त येणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे इत्यादी त्रास होऊ लागतात.

हिरड्यांमध्ये सूज येत असेल तर त्यापासूनच पायरीया या आजाराचा जन्म होतो. पायरीया हा एक सर्वसामान्य आजार असून जगभरात सर्वच ठिकाणी तो अढळून येतो. ज्या व्यक्‍ती आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात, त्याच या आजारापासून दूर राहू शकतात. अन्यथा 75 टक्‍के लोक कधी ना कधी तरी जिंजिवायटिस अर्थात हिरड्यांना सूज येणे या आजारामुळे त्रस्त होतात. ज्यावेळी दातांच्या आणि हिरड्यांच्या स्वच्छतेकडे, आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही तेव्हाच पायरीयाचा रोग उद्‌भवतो. दात आणि हिरड्यांच्यामध्ये अन्नाचे कण, लाळ आणि बॅक्‍टेरीया जमा होतात. याला दंतचिकित्सक “प्लाक’ असे म्हणतात. ब्रश केल्यानंतर चार ते बारा तासांमध्ये प्लाक बनणे सुरू होते. हे रोखण्यासाठी आवश्‍यक ते उपाय केले नाहीत तर ते कडक होऊन दातांवर पिवळट थर जमा करतात. यामुळे हिरड्यांना सूज येते. हिरड्या सूजल्यामुळे त्यांचा रंग गडद होतो. यामुळे हिरड्यांमध्ये जळजळ होऊ लागते. कधी कधी त्यातून रक्‍तही येते. या परिस्थितीतही उपचार केले नाहीत तर हिरड्यांच्या खाली हाडे आणि इतर पेशींनादेखील सूज येते आणि त्या सडू लागतात. याला पेरीओडोन्टायटिस असे म्हणतात.

या स्थितीत गेल्यानंतर हिरड्यांची दातांवरची पकड ढिली होऊ लागते आणि दात हिरड्यांपासून मोकळे होऊ लागतात. खालच्या जबड्याचे हाड सडू लागते आणि त्यात पू बनणे सुरू होते. दात हलायला लागून ते पडू लागतात. या सर्व त्रासापासून दूर राहण्यासाठी आपल्याला दातांची आणि हिरड्यांची चांगल्या प्रकारे देखभाल केली पाहिजे. जेणेकरून शेवटपर्यंत हे दात आपल्यासोबत राहतील.

यासाठीच काही आवश्‍यक उपाय आहेत ज्यांचे पालन करणे प्रत्येकासीठच आवश्‍यक आहेत. अशाच काही उपायांबद्दल आपण जाणून घेऊ. दात आणि हिरड्यांसाठी सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ नक्‍की द्यायला हवा. ब्रश करण्याची पद्धत चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे. केवळ एक दैनंदिन क्रिया म्हणून त्याकडे बघू नये. सकाळी उठल्यानंतर किंवा न्याहरीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून योग्य प्रकारे ब्रश करावा. याला आपल्या दिनचर्येत सामिल करून घ्यावे. काहीही झाले तरी ब्रश केल्याशिवाय अंथरुणात झोपण्यासाठी जाऊ नये.

ब्रश करण्याची योग्य पद्धत
ब्रश हिरड्या आणि दातांच्या वर 45 अंशांच्या कोनात हळूहळू फिरवावा. पहिले गोल गोल, नंतर वरून खाली आणि शेवटी खालून वर अशा पद्धतीने तो फिरवावा. ब्रश गोलाकार फिरवल्यामुळे हिरड्यांना मालिश होते आणि वर खाली केल्यामुळे दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून दातांची स्वच्छता होते. ब्रश करताना दातांच्या बाहेरच्या पृष्ठभागासोबतच आतील पृष्ठभागाची स्वच्छता केली पाहिजे. ब्रश नेहमी मऊ दात असलेलाच वापरावा. कारण असा ब्रश दात आणि हिरड्यांसाठी चांगला असतो. काहीशा कडक दातांचा ब्रश जास्त दिवस चालत असला तरी यामुळे दातांचे इनॅमल लवकर घासले जाते. त्यामुळे असा ब्रश दातांसाठी चांगला नसतो.

फ्लॉसिंग ही दातांमधील अडकलेले अन्नकण किंवा प्लॉक काढण्यासाठी अतिशय लाभदायक क्रिया आहे. दातांमध्ये फ्लॉसिंग करून ते सतत स्वच्छ केले पाहिजेत. यासाठी 45 सें.मी.चा फ्लास वापरून तो दातांमध्ये टाकून हळूहळू पुढे मागे करावा. दातांच्या मुळापर्यंत अशी स्वच्छता करावी. दातांची स्वच्छता करण्यासाठी माऊथवॉशचा वापर देखील केला पाहिजे. लिस्ट्रीनसारखे माऊथवॉश हे जीवाणू रोधक असते आणि हिरड्यांना व दातांना प्लाकपासून सुरक्षित ठेवते.

हिरड्या आणि दातांवर घाण साचली तर त्वरित दंतवैद्यांकडून त्याची स्वच्छता करून घ्यावी. यासाठी आजकाल बरीच तंत्रे विकसित झालेली आहेत. साधारण स्केलिंग, अल्ट्रासाऊंड स्केलिंग यासारख्या तंत्रांचा वापर करावा. यामुळे साचलेला मळ जातो आणि दात व हिरड्या यांची मजबुती वाढते. बरेचदा या उपचारांमुळे दात कमकुवत होतात असे अनेक जण विचार करतात. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे उलट दात आणि हिरड्यांचे आयुष्य वाढते. टॅनिक ऍसिडयुक्‍त गम पेन्टने मालिश केल्याने हिरड्या मजबूत होतात. हा उपचार पायरियाच्या प्रारंभिक टप्प्यावर लाभदायक ठरतो.

हिरड्यांवर सूज, रक्‍त किंवा त्यातून पू आल्यास अजिबात दुर्लक्ष करू नेये. दंतवैद्यांकडून ताबडतोब इलाज करून घ्यावेत. कारण सुरुवातीच्या अवस्थेत ऍण्टीबायोटीक, सूज आणि वेदना दूर करणारी औषधे, तसेच गम पेन्ट यांचा वापर, स्केलिंग यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. आजार वाढला तर रूट कॅनलिंग करावे लागते. यामध्ये इंजेक्‍शन देऊन दुखरा भाग बधिर केला जोतो. नंतर दातांच्या मुळांचा खडबडा भाग समतल बनवला जातो. गरज पडल्यास हिरड्या आणि दातांच्या मध्ये जीवाणू रोधक औषधाने स्वच्छता केली जाते. म्हणजे, रोग जंतू नाहिसे होऊन आणि खालील स्वस्थ पेशी पुन्हा नव्याने उगून हिरड्यांच्या आरोग्याला मजबुती देऊ शकतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)