सकस आणि पोषण आहार (भाग-2)

सकस आणि पोषण आहार (भाग-1) 

-डाॅ. स्वाती घोडमारे

अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्‍यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती याबाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्‌या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्‍यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्‍य नसल्याने यासर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.

आहाराचे नियोजन

पदार्थांचा रंग, पोत, चव, आकार यालाही महत्त्व आहे. एकाच जेवणात यासर्व बाबींचा विचार होणे आवश्‍यक आहे. खाद्यपदार्थांचे आयोजन करताना त्यांचे रंगही लक्षात घ्यावे. जसे पांढरा भात, पिवळे वरण, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी, रंगीत कोशिंबीर, पिवळी कढी इत्यादी. पातळ, घट्ट, मऊ कुरकुरीत असे पदार्थ आहारात असावेत. पातळ वरण, घट्ट फळभाजी, मऊ भात, पोळी, भाकरी, कुरकुरीत पापड इत्यादी.

अन्न शिजविण्याच्या विविध पद्धतींचा वापर करावा. जसे भाजलेली पोळी, तळलेली पुरी, उकळलेला भात, वाफवलेली इडली. आंबट, गोड, तिखट अशा चवीचे पदार्थ एकाच जेवणात असावे. ताटातील संपूर्ण पदार्थापैकी काही सौम्य, मध्यम व काही तीव्र चवीचे असावे. म्हणजे सौम्य मसाले भात, मध्यम भाजी आणि तीव्र चटणी.

विविध अन्नपदार्थ शिजविण्याच्या पद्धतीचा वापर करत असताना खाद्य पदार्थांतील पोषक तत्त्वांचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी. ऋतुमानानुसार भाज्या आणि फळे यांची उपलब्धता विशेष असते. त्यामुळे ज्या ऋतूत ज्या भाज्या आणि जी फळे मिळतील त्यांचा आहारात उपयोग करावा. संपूर्ण दिवसातील आहारामध्ये विविधता असावी. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, सायंकाळची न्याहारी आणि रात्रीच्या जेवणाचा विचार होणे आवश्‍यक आहे.

तीव्र मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण ते पचनेंद्रियांना बाधक ठरतात. घरात वृध्द माणसे व लहान मुले असतील त्यांचा विचार करुन आहाराचे नियोजन करावे. रोजच्या आहारातून कमी खर्चात जास्तीत जास्त पोषकमुल्ये मिळविणे शक्‍य आहे. आहार तोच, पण ज्ञान आणि कौशल्याचा वापर केला तर आपण योग्य पोषण मिळवू शकतो.

काही दक्षता तांदूळ, डाळ जास्त वेळा धुऊ नये. कारण त्यातील पौष्टिक घटक वाहून जातात. शिजताना भाताचे पाणी काढून फेकू नये. बरेच लोक पुलाव, बिर्यानी मोकळी होण्यासाठी तांदूळ पाण्यात अर्धवट शिजवून ते पाणी फेकून देतात, पण त्यामुळे पौष्टिक मुल्यांचा ऱ्हास होतो. भाजी कापण्याआधी धुऊन निथळून घ्यावी. कापून धुतली असता अन्नसत्त्वे पाण्याबरोबर नाश पावतात.

दोन्ही वेळच्या जेवणात एक वाटीभर वरण असावे. वरण किंवा आमटी करताना एक डाळ वापरण्याऐवजी दोन, तीन डाळी मिसळून करावी. रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकाराच्या भाकरी घ्याव्यात. कधी ज्वारी, कधी बाजरी कधी नाचणीची भाकरी बनवावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)