जाणून घ्या डोकेदुखी बाबत सर्वकाही…

डॉ. चैतन्य जोशी
डोकेदुखी हे अगदी नेहमी आढळणारे लक्षण आहे. बऱ्याच वेळा डोकेदुखीमागे निश्‍चित ठोस आजार नसतो. मानसिक ताण, भूक, उपासमार, गोंगाट, वातावरणातील बदल, अपचन, बद्धकोष्ठ, इत्यादी कारणांमुळेही डोकेदुखी होत असते. यामुळे डोकेदुखी एक किरकोळ तक्रार समजली जाते. अशी डोकेदुखी ते कारण शमले, की आपोआप दूर होते. अन्यथा ऍस्पिरिन, पॅमालच्या गोळीनेही थांबते. मात्र, डोकेदुखीमागे गंभीर कारणे असू शकतात (उदा. मेंदूसूज). डोकेदुखीमागे किरकोळ कारण नाही असे वाटल्यास आणि ऍस्पिरिन, पॅमालने थांबत नाही (किंवा तात्पुरती थांबून परत चार-पाच तासांनी येते) अशा डोकेदुखीचा विचार रोगनिदानासाठी केला पाहिजे. फक्त 10% डोकेदुखीमागे काहीना काही अंतर्गत आजार असतो म्हणूनच डोकेदुखी ही एक अगदी गुंतागुंतीची तक्रार आहे. डोकेदुखीचे शास्त्र आता बऱ्यापैकी विकसित झालेले आहे. डोकेदुखीबद्दल आणखी माहिती येथे दिली आहे.
डोकेदुखीचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. 
(अ) प्राथमिक
(ब) आजारसंबंधित डोकेदुखी.
या दोन गटांत अनेक कारणे समाविष्ट आहेत. 
(अ) प्राथमिक डोकेदुखी – यात चार उपप्रकार आहेत. यात डोकेदुखीमागे दुसरा कोणता आजार नसतो.
1. अर्धशिशी
2. तणाव-डोकेदुखी
3. चक्री डोकेदुखी
4. इतर
(ब) आजारसंबंधित डोकेदुखी : ही डोकेदुखी कोणत्यातरी आजारामुळे येते.
1. रक्तवाहिन्यांचे दोष – गुठळ्या, रक्तस्राव, इ.
2. मेंदूचे जंतुदोष – उदा मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, मेंदू-हिवताप, इ.
3. कर्करोग – मेंदूतल्या गाठी
4. इजा – मार
5. डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी
6. इतर संस्थांचे आजार उदा. फ्लू, डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू, सायनसदुखी.
7. मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी, मानदुखी. अर्धशिशी ही डोकेदुखी सहसा डोक्‍याच्या अर्ध्या भागात होते. (70% वेळा) पण कधीकधी ती दोन्ही बाजूसही येते.
याबरोबर मळमळ, उलटी, प्रकाश सहन न होणे वगैरे त्रास असतो. बऱ्याच रुग्णांना अर्धशिशी येणार अशी पूर्वसूचना मिळते. हा आजार कुटुंबामध्ये अनेकांना असू शकतो. अर्धशिशी डोकेदुखीच्या आधी आणि नंतरही परिणाम जाणवतात. डोक्‍याच्या हालचालीने डोकेदुखी वाढल्यासारखी वाटते. उलटी झाल्याने डोकेदुखी बहुधा थांबते. हा आजार लहानपणीच सुरू होतो. बहुतेक वेळा हा आजार 1-2 दिवसात पूर्ण थांबतो त्यानंतर काही दिवसांनी ही डोकेदुखी परत येते. क्वचित ही डोकेदुखी तीन दिवसांपेक्षा जास्त टिकते.
मासिक पाळी येण्याचा आणि अर्धशिशीचा थोडाफार संबंध आहे असे दिसते. या आजाराचे कारण चेतातंतू किंवा रक्तवाहिन्यांचे तात्पुरते आकसणे हे असते. उपचार अर्धशिशीचा उपचार बरेच रुग्ण स्वत:च करतात. ऍस्पिरिन पॅमाल ही नेहमीची औषधे बहुधा उपयुक्त ठरतात. हीच औषधे अर्धशिशीच्या आधी पूर्वसूचना मिळाल्यावर घेणे जास्त उपयुक्त असते. याशिवाय इतर अनेक औषधे उपलब्ध आहेत पण ती डॉक्‍टरी सल्ल्यानुसार वापरावीत.
तणाव-डोकेदुखी
काही जणांना दीर्घ किंवा आकस्मिक मानसिक तणावामुळे डोकेदुखी होते. तणाव, निराशा, दु:ख या भावनांमुळे ही डोकेदुखी होऊ शकते. याचे मुख्य कारण डोक्‍याच्या विविध स्नायूंमध्ये तणाव निर्माण होऊन डोके दुखते. ही डोकेदुखी बराच वेळ टिकते व विश्रांतीने कमी होते. वेदनाशामक गोळ्या व विश्रांती हाच यावरचा उपाय आहे.
चक्री डोकेदुखी (क्‍लस्टर डोकेदुखी)
ही डोकेदुखी काही कालावधीनंतर परत परत येते. एकदा आल्यावर तासभर टिकते, कमी होते. दिवसात ती 1-2 वेळा उद्‌भवते. कधीकधी ही मद्यपानामुळे सुरू होते, पण बहुतेकवेळा काही कारण सांगता येत नाही. काही ऋतूंमध्ये ही डोकेदुखी जास्त वेळा येते. या डोकेदुखीबरोबर डोळ्यांना पाणी येणे, नाकातून पाणी येणे ही लक्षणे दिसतात. हा आजार प्राथमिक डोकेदुखी या गटात असला तरी इतर गंभीर आजार नाही याची खात्री करावी लागेल. यासाठी एकदातरी तज्ज्ञाने तपासणे महत्त्वाचे आहे. कदाचित मेंदूचा स्कॅन करावा लागू शकतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)