“एचसीएमटीआर’साठी पुढचे पाऊल

सल्लागार नेमण्याला स्थायीची मंजुरी : 37 किमी वर्तुळाकार रस्ता

पुणे – शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी नियोजित “उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग’ (एचसीएमटीआर) साठी 63 लाख रुपये देऊन सल्लागार नेमण्याला महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅपिटल फॉर्च्युन प्रा. लि. असे या कंपनीचे नाव असून, ही बंगळुरू येथील कंपनी आहे. या प्रकल्पाला सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये लागणार असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा भांडवली खर्च उभारण्यापासून ते अनुषंगिक सेवा आणि निविदा प्रक्रियेपर्यंत ही कंपनी सल्ला देणार असल्याचे महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

1987 च्या विकास आराखड्यात (डीपी) “एचसीएमटीआर’ प्रस्तावित करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख 60 रस्त्यांना जोडणारा हा रस्ता 37 किलोमीटर वर्तुळाकार असणार आहे. बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-सेनापती बापट रस्ता-पौड फाटा-कर्वे रस्ता-दत्तवाडी-सारसबाग-शंकरशेठ रस्ता-नेहरू रस्ता-लुल्लानगर-वानवडी-रामवाडी-मुंढवा-वडगावशेरी-विमाननगर-विश्रांतवाडी असा एचसीएमटीआरचा मार्ग असेल. शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या 60 छोट्या-मोठ्या रस्त्यांना जोडता येणार आहे. त्याची आखणी करताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही प्रमुख रस्त्यांना प्रस्तावित मार्ग जोडला जाईल.

या मार्गाची लांबी 36 किमी असून रुंदी 24 मीटर आहे. दोन्ही बाजूस तीन याप्रमाणे 6 मार्गिका प्रस्तावित आहेत. रस्त्यासाठी 77 हेक्टर जागा आवश्यक असून, 35 हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. 20 हेक्टर जागा खासगी आहे.

मात्र, 1987 पासूनच हा प्रकल्प गांभीर्याने घेण्यात आला नाही. सल्लागार नेमणे, आराखडे बनवणे, भूसंपादन या प्रक्रिया कुर्मगतीने सुरू आहेत. याशिवाय दरवर्षी या प्रकल्पासाठी करण्यात येणारी तरतूदही वर्गीकरणातून वाया जात आहे. मात्र आता सल्लागार नेमण्याची प्रक्रिया तरी पुन्हा महापालिकेने सुरू केली आहे. त्यांच्या मतानुसार, प्रकल्प राबविण्यासाठी अंदाजे 5 हजार 96 कोटी रुपयांची आवश्यकता असणार असून, मालमत्ता व्यवस्थापन विभागाने भूसंपादनासाठी 1,550 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे निधीची उपलब्धता, प्रकल्पाची पूर्तता या सगळ्या गोष्टी कशा शक्य होतील याचा सल्ला ही कंपनी देणार आहे. हा प्रकल्प झाला तर शहराच्या सर्व उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर आणि अंतर्गत भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)