#HBD Sonalee Kulkarni : सिनेसृष्टीची अप्सरा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा ‘सोनाली कुलकर्णी’चा आज वाढदिवस आहे. आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने मराठी प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत देखील पाहुणी कलाकार म्हणून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सोनालीने आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर, तिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून चित्रसृष्टीमध्ये आपले पाऊल टाकले. या चित्रपटाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील प्राप्त झाला.

सोनाली कुलकर्णी मूळची पुण्याची असून, तिचा जन्म १८ मे १९८८ रोजी मनोहर आणि सविंदर कुलकर्णी या दांपत्याच्या घरी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून, माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केली आहे. तसेच सोनालीने पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिला अतुल हा लहान भाऊ असून तो देखील चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे.

खऱ्याअर्थाने सोनालीला तिच्या ‘नटरंग’ सिनेमातील ‘अप्सरा आली’ या लावणी नृत्यामुळे ओळख मिळाली. तिच्या या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत ‘मितवा’ हा चित्रपट केला होता. यानंतर सोनालीने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला- २, पोस्टर गर्ल, क्लासमेट्स, हंपी, शटर इत्यादी अनेक सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्याचबरोबर ग्रँड मस्ती या सिनेमातून तिने हिंदी चित्रसृष्टीमध्ये आपले पाऊल टाकले. या सिनेमात रितेश देशमुखच्या पत्नी ममता हिची भूमिका सोनालीने केली होती. तसेच, अभिनेता अजय देवगण याच्या सिंघम-२ सिनेमात देखील सोनालीने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)