झिंगाट गाण्यातून आपल्या संगीताने सर्वांच्या मनावर झिंग चढविणारे अतुल गोगावले यांचा आज ४२ वा वाढदिवस. आपल्या आवाजाने आणि संगीताने प्रत्येकाच्याच मनावर अधिराज्य गाजविणारे अजय-अतुल यांची गाणी आज प्रत्येकाच्याच मनात आहेत. अजय-अतुल यांच्या संगीताचे मराठीसहित बॉलिवूड इंडस्ट्रीही फॅन आहे.

पुण्यातील आळंदीमधील महसूल विभागीय अधिकारी अशोक गोगावले यांच्या ११ सप्टेंबर १९७४ रोजी अतुल यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने यामध्येच करियर करण्यासाठी ते मुंबईत आले. अजय-अतुल यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अल्बम ‘विश्वविनायक’ प्रसिद्ध झाला आणि त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

नटरंग, सैराट, अगंबाई अरेच्चा, उलाढाल, जत्रा, सावरखेड-एक गाव, गोड गुपित, फॅन्ड्री यासारख्या एक ना अनेक मराठी चित्रपटांना त्यांच्या संगीताचे भाग्य लाभले आहे. याशिवाय अग्निपथ, पीके, सिंघम, ब्रदर्स, धडक या हिंदी चित्रपटानाही संगीत दिले आहे. यातील सैराट चित्रपटातील गाण्यांनी प्रसिद्धीचे सर्वच रेकॉर्ड तोडले. अजय-अतुल यांच्या संगीताच्या कारकिर्दीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे.

जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी अजय-अतुल यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर २०१५ सालच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी फोर्ब्सच्या १०० जणांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले होते.

अतुल गोगावले यांना दैनिक प्रभाततर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)