कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांवरील लाठीमार : दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

– गिरीष बापट यांचे आश्वासन

– सात दिवसांत करणार चौकशी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई  – पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर व मुकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. पोलीसांच्या नाहक मारहाणीसंदर्भात विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर पुण्याचे पालकमंत्री व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले.

मुकबधिरांसाठी सांकेतिक भाषातज्ज्ञ नेमण्यासंदर्भातील निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केल्यानंतर पुण्यात झालेल्या लाठीमारावर विधानसभेत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ज्या कर्णबधिरांना बोलता येत नाही, त्यांची भाषा तुम्हाला समजत नाही…ना तुमची भाषा त्यांना समजत…मग कर्णबधिरांनी असा काय मोठा अपराध केला, म्हणून त्यांच्यावर लाठीमार केला, असा सवाल करीत सरकारला लाज नाही वाटत का, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांनी या आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला हा निर्दयी होता. त्यामुळे असा निर्दयीपणे लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा, अशी मागणी बच्चु कडू यांनी केली. विरोधी पक्षाचा आग्रह लक्षात घेऊन गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी चौकशी करण्याचे मान्य केले. तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सरकारने माफी मागावी – विखे-पाटील                                                                                      मूक व कर्णबधीर तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर सरकारने तात्काळ जाहीर माफी मागावी आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करत विखे-पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा एवढा वाढला आहे की त्यांना दिव्यांगांचीही दया आली नाही. पण सरकारमध्ये थोडी जर नैतिकता शिल्लक असेल तर दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि नंतर चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

लातूर, नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय
मुकबधिरांच्या उच्च शिक्षणकरिता उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणी होती. सध्या पाच विभागात ही विद्यालये सुरु असून लातूर आणि नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असे राजकुमार बडोले यांनी निवेदनाच्या माध्यमातून सांगितले.

पदांच्या निश्‍चितीसाठी असलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये या संघटनेच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सामान्य शासकीय विद्यालयांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल, असे सांगतानाच दिव्यांगाकरिता शासकीय नोकरीसाठी आरक्षित पदांवर पात्र ठरल्यास त्यामधून अंध, मुकबधीर प्रवर्गातील उमेदवारास नियुक्ती देताना प्राधान्य दिले जाईल, असे बडोले म्हणाले.

मुकबधिर व्यक्तीस सक्षम वैद्यकीय अधिकाछयाने पात्र ठरविल्यानंतर त्याला वाहनचालक परवाना देण्यात येईल आणि नियुक्ती झालेल्यांची बेरा तपासणी करण्याबाबत सामान्य प्रशासन व आरोग्य विभागामार्फत आठ दिवसात परिपत्रक काढले जाईल, असे बडोले यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)