हरिनामाने अलंकापुरी दुमदुमली ; नगरप्रदक्षिणेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची सांगता 

इंद्रायणीचा घाट पुन्हा फुलला 

आळंदी: आळंदीतून 6 जुलै रोजी माऊलींच्या पालखीने पंढरपूकडे प्रस्थान ठेवले होते, त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेऊन पालखी सोहळा मंगळवारी (दि. 7) आळंदीत दाखल झाल्यानंतर आज (बुधवारी) नगरप्रदक्षिणेने सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, सांगता सोहळ्यानिमित्त आज राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविकांनी स्नानासाठी इंद्रायणी नदीच्या दोन्ही घाटावर गर्दी केली होती.

-Ads-

मंदिरातील नवीन दर्शन मंडपबारी आज सकाळपासूनच भक्‍तांची गर्दी झाल्याने केवळ आषाढी व कार्तिकी यात्रेत दर्शनबारीसाठी वापरात येणारा भक्‍ती-सोपान पुलावर देखील भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे तीनपासून माऊली मंदिरातील नित्याचे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर श्रींना नैवेद्य देण्यात आला व दुपारी 12.30 वाजता ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करीत टाळ-मृदंगाच्या निनादात हजारो वैष्णवांसमवेत श्रींची पालखी नगरप्रदक्षिणे करीता हजेरी मारूती मंदिराकडे निघाली. प्रथापरंपरेप्रमाणे हजेरी मारूती मंदिरात पालखी विसावताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर किर्तन सेवा होऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेले दिंडीकरी, मानकरी, टाळकरी, चोपदार, मालक आदींचा देवस्थानांचे वतीने नारळ-प्रसाद वाटप करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होऊन पालखी माऊली मंदिरात विसावली.

दरम्यान, दर महिन्याच्या एकादशीला माऊली मंदिरात भाविकांच्या मोफत आरोग्य सुविधेसाठी पिंपरी येथील डि. वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीसह औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनिता पाटसकर, अन्नु भारद्वाज, रवींद्र येळवंडे, कृष्णा भारद्वाज व प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.

 नो पार्किंमध्येही बिनदिक्कत दुचाकी पार्क 

माऊली मंदिराकडे जाणाऱ्या चारही रस्त्यावर बॅरिगेट लावले नसल्याने चारचाकी, दुचाकी वाहने व निरनिराळ्या व्यावसायिकांनी जागा व्यापल्याने भाविकांना दिवसभर अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागत होता. तर भराव रस्ता (पितळी गणपती मंदिराजवळ) परिसरात सर्रासपणे दुचाकी लावण्यात आल्या होत्या. तसेच महाद्वारात नो पार्किंग झोन असताना बिनदिक्‍तपणे दुचाकी लावण्यात आल्याने भाविकांना अडथळ्यांची शर्यत पार करीत मंदिरात प्रवेश करावा लागल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. दरम्यान, शहरातील रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने प्रवशांचे हाल झाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)