वंडरशेलमध्ये विद्यार्थ्यांची पायी दिंडी
यशवंतनगर, वडगाव, हेळगावात बालचमूंची दिंडी
कोपर्डे हवेली – यशवंतनगर, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. यावेळी अभंगाच्या तालावर टाळ हातात घेऊन बाल वारकरी माऊलींच्या जयघोषात दंगून गेले. पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. चौकाचौकात मुलींनी फुगड्यांचे फेर धरले.
बाल वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी शालेय शिक्षण समितीचे विठ्ठल थोरात, उमेश अडसूळे, धनाजी थोरात, मुख्याध्यापक भीमराव पाटील, पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची ओळख निर्माण करण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात यावेत. असे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी सांगीतले.
हेळगाव – सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सांप्रदायिक वातावरण असून अनेक मानाच्या तसेच गावच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावागावात भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. चालू वर्षी उशीर का होईना पाऊस चालू झाला असून यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा समाधानी आहे. पेरणीची कामे बऱ्यापैकी आटोपून सर्व महिला, भगिनी तसेच शेतकरी, ग्रामस्थ लोक आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत.
हेळगाव मधील प्राथमिक शाळेची बालचमुंनी दिंडी सोहळ्यात कुणी वारकऱ्यांच्या पोशाख, कुणी खांद्यावर भगवी पताका घेऊन तर कुणी डोक्यावर तुलसी घेऊन विठू चा नामघोष करत गावातून फेरी काढली. गावकरी महिला सुद्धा या दिंडीचे उस्फुर्तपणे स्वागत करत होत्या. व मुलांच्या या अनोख्या दिंडीला दाद देत होत्या. काही विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेचे संदेश तर काहींच्या हातात पर्यावरणचे संदेश होते.
संपूर्ण गावातून फिरून आल्यावर ही दिंडी पुन्हा शाळेत येऊन विसावली. पण याची चर्चा मात्र दिवसभर गावात रंगत होती. मराठी शाळेबरोबर येथील इंग्लिश मीडियम स्कूलने सुद्धा अशाच प्रकारे दिंडीचे आयोजन केले होते.
कराड –वंडरशेलच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी काढली. पालखीचे पूजन माजी उपसरपंच सुषमा जमाले यांनी केले. यावेळी प्राचार्य आश्विनी जमाले, अनिता जमाले तसेच दिपाली ननवरे, गितांजली सुतार, लता पवार यांनी दिंडीचे नियोजन केले.
मुलांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर मुक्ताई असे विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. विठूनामाचा गजर व टाळ-मुदृगांच्या नामघोषाने चिमुकल्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी निता यादव, सुरेखा भोसले, कल्याणी गुरव, आम्रपाली चव्हाण यांची उपस्थिती होती. वसंतराव कळेकर यांच्याकडून चिमुकल्यांना खाऊवाटप करण्यात आला. वडगांव हवेली ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कन्या विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विठु-नामाच्या गजरात रंगून जावून दिंडी काढली.