विशेष : हसिनांचा विजय भारतासाठी सुसंधी (भाग २)

विशेष : हसिनांचा विजय भारतासाठी सुसंधी (भाग १)

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्‍लेषक) 

नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये मागील काळात झालेले सत्ताबदल हे भारताच्या चिंता वाढवणारे ठरले आहेत. तशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरीया आणि अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचे सूतोवाच केल्यामुळे इसिस आणि तालिबानच्या कारवाया वाढण्याच्या शक्‍यता बळावल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत बांगला देशात पुन्हा एकदा शेख हसीना यांचे सरकार सत्तेत येणे हा भारताला एक मोठा दिलासा आहे. बांगला देशात लोकशाही स्थिरावत असून हा देश आता विकसनशील राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. ही भारतासाठी एक संधी आहे. ती गमावणे म्हणजे चीनला आयता घास देणे ठरेल. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेख हसीना यांच्या या कामगिरीची भेट म्हणून भारताने 1971 पासून प्रलंबित असणारा लॅंड बॉर्डर ऍग्रीमेंट हा करार पूर्णत्वास नेला. जवळपास 30-35 वर्षे या कराराला आपल्याकडे विरोध होत होता. पण विद्यमान केंद्र सरकारने हा करार यशस्वीपणे पूर्ण केला. त्यामुळे बांगला देश आणि शेख हसीना यांच्यासोबत भारताचे संबंध अधिक घट्ट झाले.
आताच्या निवडणुकीत शेख हसीनांचा पराभव होऊन बीएनपी या पक्षाची सत्ता आली असती तर मूलतत्ववादी घटकांच्या हातात सत्ता गेली असते. तसे झाले असते तर ती गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक ठरली असती. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अफगाणिस्तानातील सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढणार आहे.

1996-2001 मध्ये तालिबानी राजवटीच्या काळात अफगाणिस्तान हा दहशतवाद निर्माण कऱणारा कारखानाच झाला होता. त्याचे परिणाम भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना सहन करावे लागले होते. भारतात काश्‍मीरमध्ये याचे परिणाम झाले होते. आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारताच्या पश्‍चिमेकडील सीमारेषा या पुन्हा तणावग्रस्त होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी बांगलादेशात बीएनपी सत्तेवर आला असता तर पूर्वेकडील सीमावर्ती भागातही भारताची डोकेदुखी वाढली असती. पण हा अनर्थ टळला आहे. त्यामुळे भारतासाठी हा एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल. येणाऱ्या काळात शेख हसीना यांच्या विजयाचा वापर भारताने करून घेणे आवश्‍यक आहे. आज बांगलादेश आर्थिक विकासाच्या टप्प्यावर आहे. त्यात भारताचा सहभाग असणे गरजेचे आहे. यासाठी भारताने बांगलादेशला आर्थिक मदत केली पाहिजे.

भारताने म्यानमाररला आपल्या ऍक्‍ट ईस्ट पॉलिसीचा भाग बनवले. तशाच पद्धतीने बांगलादेशला देखील या पॉलिसीचा एक भाग बनवले पाहिजे. कारण ईशान्य भारताच्या विकासासाठी भारताला बांगलादेशशी चांगले संबध ठेवणे आवश्‍यक आहे. अलीकडील काळात भारताने सागरी संपत्तीच्या विकासाचे बहुराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये बांगलादेशचे सहकार्य आणि सहभाग महत्त्वाचा आहे. बीबीआयएन प्रकल्प, मोटार व्हेईकल ऍग्रीमेंट, भारत- बांगलादेश-म्यानमार- थायलंड असा रस्ते विकासाचा प्रकल्प यांसारख्या साधनसंपत्तीच्या विकासाच्या प्रकल्पात भारताने बांगलादेशला सहभागी करून घेतले पाहिजे.

मागील काळाचा विचार करता भारताकडून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद वेळेवर होत नाही असे दिसून आले आहे. तसेच हे प्रकल्प रेंगाळत असल्याचेही दिसून आले आहे. बांगलादेशच्या आर्थिक विकासात भागीदार होण्यासाठी चीन जबरदस्त प्रयत्नशील आहे. चीनने बांग्लादेशला भरभक्‍कम आर्थिक मदत देऊ केलेली आहे. चीनचा फास बांगलादेशाभोवती आवळला जाऊ द्यायचा नसेल तर त्यांच्या विकासासाठी भारताला हातभार लावणे गरजेचे आहे. यासाठी भारताने ऍक्‍ट ईस्ट पॉलिसीसाठी बांगलादेशला केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात होत असणाऱ्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनासाठी बांगलादेश ही उत्तम बाजारपेठ आहे. त्या दृष्टीनेही बांगलादेशचा वापर केला पाहिजे. थोडक्‍यात, शेख हसीना यांचा विजय ही भारतासाठी नववर्षातील नवी संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी भारताने नियोजनपूर्वक पावले टाकणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)