विशेष : हसिनांचा विजय भारतासाठी सुसंधी (भाग १)

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्‍लेषक) 

नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये मागील काळात झालेले सत्ताबदल हे भारताच्या चिंता वाढवणारे ठरले आहेत. तशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरीया आणि अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचे सूतोवाच केल्यामुळे इसिस आणि तालिबानच्या कारवाया वाढण्याच्या शक्‍यता बळावल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत बांगला देशात पुन्हा एकदा शेख हसीना यांचे सरकार सत्तेत येणे हा भारताला एक मोठा दिलासा आहे. बांगला देशात लोकशाही स्थिरावत असून हा देश आता विकसनशील राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. ही भारतासाठी एक संधी आहे. ती गमावणे म्हणजे चीनला आयता घास देणे ठरेल. 

बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अवामी लीगच्या शेख हसीना या प्रचंड बहुमत मिळून विजयी झाल्या आहेत. 300 सदस्य संख्या असलेल्या बांगलादेशच्या संसदेमध्ये 288 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. हा विजय बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. शेख हसीना तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांगला देशातील या निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले होतेच; पण भारताचेही लक्ष लागले होते. याचे कारण गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या शेजारील देशांमध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये धक्‍कादायक निकाल आले होते. नेपाळमध्ये सध्या साम्यवादी शासन सत्तेत आले आहे. भूतानमध्ये सत्तांतर होऊन पूर्वी भारताला सकारात्मक असलेले सरकार जाऊन एक अनोळखी शासन आले आहे. श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अलीकडच्या काळात चीनचा दक्षिण आशियात हस्तक्षेप वाढत असतानाच अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अशा एकंदर काळजी वाढवणाऱ्या वातावरणामुळे बांग्लादेशात काय होईल आणि शेख हसीना यांना बहुमत मिळते की नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे होते.

शेख हसीनांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो की काय अशी शंकाही उपस्थित करण्यात आली होती. कारण 2009 सालापासून शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. गेल्या दहा वर्षात त्यांनी जी धोरणे स्वीकारली त्यावर मतदान अवलंबून होते. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे 2009 नंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणुका होताहेत असे म्हणता येईल. कारण 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांवर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे 153 जागांवर शेख हसीनांच्या पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्या निवडणुकीत शेख हसीना यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. यामध्ये मानवाधिकार उल्लंघनाचे आरोपही करण्यात आले होते. ह्यावेळी मात्र निवडणुकीत विरोधी पक्षांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यामुळेच निवडणूक चुरशीची होणार असे चित्र होते. पण ही चुरस न राहता अभूतपूर्व बहुमत मिळवत शेख हसीना यांचे सरकार सत्तेत आले आहे.

या विजयातून काही गोष्ट स्पष्ट होताहेत. शेख हसीना यांनी गेल्या दहा वर्षांत देशाच्या आर्थिक विकासाची धोरणे स्वीकारली होती. त्यांना मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या कारकिर्दीत बांगलादेशचा आर्थिक विकासदर 7 टक्के राहिला आहे. लक्षावधी लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढणे शक्‍य झाले आहे. त्यांच्या आर्थिक विकासाच्या योजनांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात विकसनशील देश म्हणून बांगलादेश पुढे येईल, अशा शक्‍यता आता बळावल्या आहेत.

भारताच्या दृष्टीने ही घडामोड नक्कीच महत्त्वाची आहे. भारताचे 2009 नंतर बांगलादेशशी असणारे संबंध सुधारले आहेत. 2004-2009 या काळात बांगलादेशात माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि त्यांच्या बांगलादेश पार्टीचे शासन होते. त्या काळात बांगलादेशात मूलतत्ववाद प्रचंड वाढला होता. जमात ए इस्लामी सारख्या कडव्या संघटनेचे प्राबल्य वाढले होते. अनेक दहशतवादी संघटना बांगलादेशात जन्माला येत होत्या. तसेच खालिदा झिया यांच्या काळात ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळी, संघटना यांना बांगलादेशात आश्रय दिला गेला.

या संघटना बांगलादेशच्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया करत होत्या. 2009 मध्ये शेख हसीना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बांगलादेशच्या भूमीवरून होणाऱ्या भारतविरोधी कारवाया रोखल्या. तसेच भारतातून बांगलादेशात पळून गेलेल्या फुटीरतावाद्यांना पकडून भारताच्या हवाली करण्यातचा निर्णय त्यांनी घेतला. 2009 मध्ये संपूर्ण बांगलादेशचे ध्रुवीकरण झालेले होते. मूलतत्ववादाला खतपाणी मिळत होते. धर्मनिरपेक्षतेविषयी बोलणाऱ्या लोकांच्या उघड हत्या होत होत्या. संपूर्ण देशभरात दहशतीचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमीवर शेख हसीना यांनी महत्त्वाच्या घटनात्मक सुधारणा घडवून आणल्या. त्यातून त्यांनी बांगलादेशमधील लोकशाहीला मजबूत पाया प्राप्त करून दिला.

1971 मध्ये बांगलादेश स्वातंत्रयुद्धात ज्या लोकांनी पाकिस्तानला मदत केली होती, तसेच पाकिस्तानचे हस्तक म्हणून काम करून निष्पाप बांगलादेशी नागरिकांवर अत्याचार केले होते त्यांच्यावरचे खटले अनेक दशके प्रलंबित होते. ते शेख हसीना यांनी पूर्णत्वास नेले. त्यात दोषी असणाऱ्या जमात ए इस्लामीच्या तीन गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या निर्णयामुळे बांगलादेशातील वातावरण सकारात्मक झाले. मध्यमवर्गीय लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मूलतत्ववादावर नियंत्रण ठेवणे शेख हसीना यांना शक्‍य झाले. याचा परिणाम भारताची ईशान्य सीमारेषा तुलनात्मकदृष्ट्या शांत राहण्यात झाला.

विशेष : हसिनांचा विजय भारतासाठी सुसंधी (भाग २)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)