मुंबई – आयपीएलच्या बाराव्या हंगामात दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफच्या जागी मुंबई इंडियन्सने पर्याय शोधला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज ब्युरन हेंड्रीक्सला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. उर्वरित सामन्यांसाठी हेंड्रीक्स मुंबईच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार असून तो लवकरच संघासोबत असेल.
हंगाम सुरु होण्याआधी न्यूझीलंडच्या ऍडम मिलनने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागेवर वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफची मुंबईच्या संघात निवड झाली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच जोसेफने 6 बळी घेऊन केवळ 12 धावा देताना सर्वोत्तम कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले होते.
मात्र, त्यानंतर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तसेच क्षेत्ररक्षण करताना अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला हंगामातून बाहेर व्हावे लागले. आता उरलेल्या सामन्यांमध्ये हेंड्रिक्सला मुंबईच्या संघात जागा मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.