धोकादायक वाड्यांवर हातोडा

सदाशिव आणि शुक्रवार पेठेतील दोन वाड्यांवर कारवाई


आप्पा बळवंत चौकातील धोकादायक भिंतही उतरविली

पुणे – कोंढवा आणि आंबेगाव येथे घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील पेठांमध्ये असणाऱ्या धोकादायक वाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत प्रशासनाने मंगळवारी सदाशिव पेठ आणि शुक्रवार पेठ येथील दोन वाडे उतरवण्यात आले; तसेच बुधवार पेठेतील एका पुस्तकाच्या दुकानाच्या मागील धोकादायक भिंतही उतरवण्यात आली.

पावसाळ्यात शहरातील धोकादायक वाडे आणि इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यांपूर्वी धोकादायक वाडे आणि इमारतींचा सर्व्हे करून त्या मिळकती रिकाम्या करण्याच्या नोटीस दिल्या जातात.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने पेठांमधील 725 इमारती आणि वाड्यांची पाहणी करून त्यातील 175 मिळकतींना नोटीसा बजावण्यात आल्या. इमारतीमधील आणि वाड्यांमधील रहिवाशी आणि भाडेकरूंना त्या रिकाम्या करण्याचे आदेश या नोटीसमधून देण्यात आले. मात्र अनेकांनी धोकादायक वाडे आणि इमारती रिकाम्या केल्या नाहीत.

त्यातच कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमा भिंती कोसळून बांधकाम मजुरांना जीव गमवावा लागल्याच्या दोन दुर्घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर नोटीस बजावूनही वाडे आणि इमारती तसेच रिकाम्या न झालेल्या धोकादायक मिळकतींवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत महापालिका प्रशासनाने मंगळवारी सदाशिव पेठेतील हत्ती गणपतीजवळील एक वाडा आणि शुक्रवार पेठेतील एक वाडा असे दोन वाडे उतरवण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. ही कारवाई या पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)