हालेप-बार्टी उपान्त्य लढत रंगणार; स्टीफन्स व स्विटोलिना यांचीही आगेकूच 

मॉंट्रियल डब्लूटीए महिला टेनिस स्पर्धा 
मॉंट्रियल: अग्रमानांकित सिमोना हालेप आणि 15वी मानांकित ऍश्‍ले बार्टी यांच्यात मॉंट्रियल महिला टेनिस स्पर्धेतील पहिली उपान्त्य लढत रंगणार आहे. तसेच अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टीफन्स व पाचवी मानांकित एलिना स्विटोलिना या अव्वल खेळाडूंनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना उपान्त्य फेरीत धडक मारली.
विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या हालेपने याआधी व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणले होते. उपान्त्यपूर्व फेरीत हालेपने सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाचा पहिल्या सेटमधील कडवा प्रतिकार मोडून काढताना 7-5, 6-1 अशा सरळ सेटमधील विजयासह उपान्त्य फेरीत स्थान मिळविले. जगातील अव्वल खेळाडू असलेल्या हालेपने या लढतीत तब्बल 19 विनर्स फटके लगावले. तसेच पहिल्या सर्व्हिसवर 77 टक्‍के गुण जिंकत या लढतीवर वर्चस्व गाजविले. हालेपने हा सामना 88 मिनिटांत जिंकून उपान्त्य फेरी गाठली.
मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणताना उपान्त्यपूर्व फेरी गाठणाऱ्या गार्सियाने पहिल्या सेटमध्ये वेगवान प्रारंभ करीत हालेपला कडवी झुंज दिली. परंतु टाळता येण्यासारख्या चुकांवर नियंत्रण राखण्यात अपयश आल्याने तिले पराभव पत्करावा लागला. गार्सियाने तब्बल 31 नाहक चुका केल्या. हालेपसमोर उपान्त्य लढतीत ऑस्ट्रेलियाच्या 15व्या मानांकित ऍश्‍ले बार्टीचे कडवे आव्हान आहे. बार्टीने दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत “जायंट किलर’ किकी बर्टन्सचा 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
अगोदरच्या फेरीते द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला चकित करणाऱ्या बिगरमानांकित आर्यना सबालेन्काला 14व्या मानांकित एलिसे मेर्टेन्सकडून तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. मेर्टेन्सने पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 4-0 अशी आघाडी घेत सनसनाटी निकालाची तयारी केली होती. परंतु स्विटोलिनाने वेळीच आपला खेळ उंचावताना मेर्टेन्सचे आव्हान 7-5, 6-3 असे 75 मिनिटांत मोडून काढले.
उपान्त्य फेरीत स्विटोलिनाला अमेरिकन ओपन विजेत्या स्लोन स्टीफन्सशी लढत द्यावी लागणार आहे. स्लोन स्टीफन्सने अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात लात्वियाच्या बिगरमानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये फडशा पाडताना उपान्त्य फेरीत धडक मारली. यंदाची अमेरिकन ओपन स्पर्दा जेमतेम दीन आठवड्यांवर आली असताना स्लोन स्टीफन्सला गवसलेला फॉर्म तिच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
वेळापत्रकावर हालेपची टीका 
उपान्त्यपूर्व फेरीत कॅरोलिन गार्सियाचा पराभव करीत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविल्यानंतर अग्रमानांकित सिमानो हालेपने चुकीच्या वेळापत्रकाबद्दल स्पर्धेच्या संयोजकांवर टीका केली. हालेपला गेल्या दोन दिवसांत तिसरा सामना खेळावा लागला आहे.
काल तर तिने ऍनेस्तेशिया पावलुचेन्कोव्हा आणि व्हीनस विल्यम्स यांच्याविरुद्ध एकाच सत्रात दोन सामने खेळले होते. हालेपची उपान्त्य लढत ऍश्‍ले बार्टीशी होणार आहे. परंतु मी याआधी कधीही बार्टीशी खेळले नसल्याने नक्‍की काय अपेक्षा करायची हेच मला माहीत नाही, असे सांगून हालेप म्हणाली की, बार्टी ही अत्यंत गुणवान खेळाडू आहे इतकेच मला माहीत आहे. बार्टीने गेल्या मोसमातही या स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)