लाहोर – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड आणि जमात उद् दावाचा म्होरक्या हाफिझ सईद आणि त्याच्या तिघा साथीदारांना पकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
हाफिझ आणि त्याच्या तिघा साथीदारांना न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे. “जमात उद दावा’या बंदी घातलेल्या संघटनेकडून शिक्षण संस्थेच्या जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी हाफिझविरोधात खटला सुरू आहे. “जेयुडी’च्या नेटवर्कमध्ये 300 शिक्षण संस्था आणि शाळा, हॉस्पिटल, प्रकाशन संस्था आणि रुग्णवाहिका सेवा चालवली जाते.
मार्च महिन्यात पंजाब पोलिसांनी ‘जेयुडी’शी संबंधित “फलाह ए इन्सानियत फौंडेशन’च्या 160 शिक्षण संस्था, 32 शाळा, चार हॉस्पिटल, 178 रुग्णवाहिका आणि 153 दवाखान्यांचा ताबा घेतला होता. सईद सध्या लाहोर्मधील जौहर भागात रहात आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सईदने केलेल्या अर्जावरून लाहोर हायकोर्टाने पंजाब सरकार आणि दहशतवाद विरोधी विभागाला नोटीस बजावली आहे. दहशतवादाला अर्थसहाय्य करण्याच्या आरोपाला सईदने आव्हान दिले आहे.