पाचवड फाट्यावर 40 लाखांचा गुटखा जप्त 

कराड – मालखेड फाटा (ता. कराड) येथे पोलिसांना चकवा देत गुटखा घेऊन निघालेला ट्रक पोलिसांनी पाचवड फाट्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अडवून 40 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक व क्‍लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक सौ. वंजारी यांना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने आयशर ट्रकमधून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सौ. वंजारी यांनी मालखेड फाट्यावर सापळा लावला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक कोल्हापूरहून आला असता तो पोलिसांनी मालखेड फाट्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने तेथे न थांबता पुढे तसाच निघून गेला.

यानंतर सौ. वंजारी यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री. भापकर यांना दिली. भापकर हे तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पाचवड फाटा येथे पोहोचले. त्यांनी महामार्गावर बॅरिकेट आडवे लावले. काही वेळातच तो ट्रक तेथे आला आणि पोलिसांनी ट्रक चालकासह क्‍लीनरला ताब्यात घेतले तसेच गुटखा असलेला ट्रक पोलीस ठाण्यात आणला. सुरुवातीला ट्रकवर व मागील बाजूस पुठ्ठे ठेवलेले आढळले. मात्र ते पुठ्ठे काढल्यानंतर आतमध्ये गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. या गुटख्याची अंदाजे किंमत 40 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत घेण्याचे काम तालुका पोलीस ठाण्यात सुरू होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here