नवी दिल्ली: गुजरात विधानसभेतील राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक दोन वेगवेळ्या दिवशी न घेता एकाच दिवशी घ्यावी अशी मागणी करणारी याचिका कॉंग्रेसच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली असून त्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाचे म्हणणे मागवले आहे. या अर्जावर सुनावणी घेण्याची गरज आहे असे नमूद करीत कोर्टाने हे मॅटर 25 जून पर्यंत तहकुब केले.
अमित शहा आणि स्मृती इराणी या दोन राज्यसभा सदस्यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे त्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेतील जाणार आहे. पण निवडणूक आयोगानेही पोटनिवडणूक दोन वेगवेगळ्या दिवशी घेण्याचे योजले आहे. त्याला कॉंग्रेसचा आक्षेप आहे. या दोन्ही जागांसाठी एकाचवेळी निवडणूक घ्यावी अशी कॉंग्रेसची मागणी आहे. या दोन्ही जागांच्या निवडणुका एकाचवेळी झाल्यातर त्यातील एक जागा कॉंग्रेसला मिळू शकते.